मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात न जाता बाहेरूनच दर्शन घेतल्याने वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी यावर प्रतिक्रिया देत या मुद्द्यावरून टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिले आहे. असे बोलणाऱ्यांवर तुम्ही बॅन आणला पाहिजे. अजित पवार जरी बोलले तरी त्यांच्यावर बॅन आणा, असे पवार यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे नास्तिक असून ते मंदिरांमध्ये जात नाहीत, अशी टीका काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती. यावरून बराच वाद झाला होता. त्यानंतर आता शरद पवार यांनी पुण्यात दौऱ्यावर असताना दगडूशेठ हलवाई मंदिराबाहेरूनच दर्शन घेतल्याचा मुद्दा चर्चेत आला आहे. यावरून शरद पवारांवर टीका केली जात आहे. शरद पवार मंदिरात का गेले नाहीत? असा प्रश्न उपस्थित केला जात असताना त्यांनी मांसाहार केल्यामुळे ते मंदिरात गेले नसल्याचे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसकडून देण्यात आले आहे. शरद पवारांनी मांसाहारी जेवण केल्याने ते मंदिरामध्ये गेले नाहीत. चुकीचा पायंडा पडता कामा नये, असे त्यांनी मला सांगितले, अशी माहिती राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी प्रसारमाध्यमांना दिली.
यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, प्रत्येकाला कुठेही जायचा अधिकार आहे. ते मंदिरात गेले तर का गेले, असे म्हणायचे आणि नाही गेले तर नास्तिक आहेत, असे म्हणायचे. यावेळी अजित पवार यांनी माध्यमांनासुद्धा सुनावले. ते म्हणाले, हे तुम्ही दाखवायचे बंद केले की, बोलणारेसुद्धा बंद होतील. असे बोलणाऱ्यांवर तुम्ही बॅन आणला पाहिजे. अजित पवार जरी बोलले तरी त्यांच्यावर बॅन आणा. (अमोल) मिटकरी तर बाजूला राहू द्या. म्हणजे मिटकरी आलाच ना त्यात? की नाही आला?
अनेक जण शाकाहार, मांसाहार करतात. मांसाहार करणारी व्यक्ती रस्त्याने निघाली असेल आणि कोणी म्हणले, एखाद्या ठिकाणी आपण दर्शनाला जाऊया. तर काही जण मनात ठेवतात कुणाला सांगत नाहीत. मात्र, काही जण बोलून दाखवतात की, मी आज इथे जाण्यासाठी ज्या गोष्टी माझ्याकडून घडायला हव्यात त्या मी केल्या नाहीत. केवळ मंदिरात जाऊन डोके टेकले तर खरे दर्शन असे नाही. कधी कधी पंढरपूरला आपण पायरीचे दर्शन घेतो ना, असे अजित पवार म्हणाले.