सगळीकडे ढवळाढवळ करण्याचा अधिकार विश्वप्रवक्त्यांना कुणी दिला ; चंद्रकांत पाटलांचा टोला

मुंबई : संभाजीराजे छत्रपती आणि आमचा विषय आहे भाजपने त्यामध्ये चोंबडेपणा करु नये, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी कोल्हापूरमधून चंद्रकांत पाटील यांना लगावला. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करत शिवसेनेसह संजय राऊत यांच्यावर टीका केली.

चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करत म्हणाले की, “मी शिवाजी महाराजांचा वंशज नाही, हे सामान्यज्ञान आहे. पण हिंदुत्वविरोध्यांसोबत चाललेल्यांना शिवरायांची मक्तेदारी कुणी दिली? तुम्ही शब्दांचे पक्के आणि बाकीचे सगळेच खोटारडे, यावर शेंबडं पोर तरी विश्वास ठेवेल? आणि हो… सगळीकडे ढवळाढवळ करण्याचा अधिकार विश्वप्रवक्त्यांना कुणी दिला?” अशा शब्दांत चंद्रकात पाटील यांनी शिवसेनेच्या भूमिकेवर टीका केली तर संजय राऊत यांनाही फटकारलं.

 

शिवसेना खासदार संजय राऊत आज शिवसंपर्क अभियानासाठी कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. त्यांनी पत्रकार परिषदेत शिवसेनेवर होत असलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देताना भाजपचा चांगलाच समाचार घेतला. त्याचबरोबर संभाजीराजे यांनाही टोला लगावला होता. आमच्यासाठी संभाजीराजेंच्या उमेदवारीचा विषय संपल्याचे राऊत म्हणाले. संजय राऊत यांनी राजेंच्या उमेदवारीवरून होत असलेल्या टीकेवरून भाजपला चांगलेच फटकारले. ते म्हणाले की, या राज्यात विरोधी पक्ष आहे पण ते विरोधासाठी विरोध करताना दिसत आहे. एखादा निर्णय घेतला की त्यावर टीका करायची हे त्यांनी ठरवलं आहे. यातून त्यांना कोणता असुरी आनंद मिळतो काय माहीत नाही, पण त्याची पर्वा न करता महाविकास आघाडी ठामपणे पुढे चालली आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली जाते.

Share