अमित शहा आणि फडणवीसांच्या नावावर सोमय्यांनी कोट्यवधींची वसुली केली – राऊत

मुंबई : शिवसेना खा. संजय राऊत यांनी भाजपचे नेते किरीट सोमय्यांवर आज पुन्हा एकदा कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला. मुंबईत पुर्नवसनाच्या नावाखाली ३०० ते ४०० कोटींची वसूली केली असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री आणि आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे तक्रार करणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.

शिवसेना खा. संजय राऊत म्हणाले की, पवईतील पेरुबाग पासपोली येथे ३८ एकरचा भूखंड आहे. हा भूखंड किरीट सोमय्याने  हडपला. पुनर्वसनाच्या नावाखाली ४३३ बोगस लोकांची घुसखोरी केली. किरीट सोमय्याचे एजंट तेथे आहेत आणि त्यांनी या 433 लोकांची घुसखोरी केली आहे. या पुनर्वसनावर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सही केली. ४३३ लोकांकडून एजंटच्या मार्फत २५-२५ लाख रुपये घेतले अशी माझी माहिती आहे. या घोटाळ्याच्या संदर्बात माझ्याकडे ट्रकभर कागदपत्र आहेत. तक्रारदार माझ्यासोबत आहेत. ३०० कोटींहून अधिक रक्कम जमा केली. किरीट सोमय्या त्यावेळी सांगत होता, देवेंद्र फडणवीस यांना ५० कोटी रुपये द्यायचे आहेत. फडणवीसांच्या नावे ही वसुली केली. त्यावर मंत्र्यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या केल्या. मी सांगते जवळपास ३०० कोटी रुपयांची वसुली फडणवीसांच्या नावे केली आहे. या सगळ्या घोटाळ्याची कागदपत्र मी आजच इकोनॉमिक ऑफिसमध्ये देणार आहे. आजच मुख्यमंत्र्यांना भेटून हा सगळा गैरव्यवहार उघडा पाडणार आहे. लोकांची काय लूट सुरु आहे, ते दाखवेन.

संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधताना, त्यांनी आणि भाजपच्या काही लोकांनी अनेक मंत्र्यांच्या नावे वसुली केली असल्याचा आरोप केला. संजय राऊत म्हणाले, सोमय्याने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या नावाने वसुली केलीच. तसेच अनेक केंद्रीय मंत्र्यांच्या नावानेही वसुली केली आहे. अमित शहांच्या नावावरही सोमय्यानं पैसे गोळा केले. मी आता एक एक भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर काढणार आहे, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

Share