सोन्याचा चमचा घेऊन काहीजण जन्म घेतात; फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका

नागपूर : काहीजण सोन्याचा चमचा घेऊन जन्म घेतात, अशी टीका राज्याचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केली आहे. शिवसेना आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी रिक्षावाला, टपरीवाला म्हणत त्यांच्यावर टीका केली होती. यानंतर फेसबुक लाईव्ह करत उद्धव ठाकरे यांनीही बाळासाहेबांनी रिक्षावाला, टपरीवाला, अगदी हातभट्टीवाल्यालाही मोठे केले, असे म्हटले होते. याचाच समाचार घेत देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांना टोला लगावला आहे.

राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवारी (५ जुलै) प्रथमच नागपुरात आले. यावेळी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यानंतर नागपूर प्रेस क्लबतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, काँग्रेस पक्षाने पंतप्रधान मोदी यांना चहावाला म्हणून हिणवले. मात्र, ज्याला चहावाला म्हणून हिणवले त्यांच्यावर मोदींनी पाणी पिण्याची वेळ आणली. मोदींनी त्यांना असे पाणी पाजले की, आज त्यांच्या पक्षाची अवस्था काय आहे, हे तुम्ही बघत आहात. फडणवीस म्हणाले, जर आम्ही रिक्षावाले असू, आम्ही पानटपरीवाले असू, आम्ही चहा टपरीवाले असू, आम्ही रस्त्यावरचे विक्रेते असू तरी आम्हाला अभिमान आहे. सोन्याचा चमचा घेऊन जे लोक जन्माला येतात, त्यांना राज्य करणे हा आमचाच अधिकार आहे, असे वाटते. त्यांनी हे समजून घ्यावे की, मोदींच्या काळात सामान्य माणूसच राजा होणार, सामान्य माणूसच राज्य करणार.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्रिपद गेल्याचे दुःख नव्हते तर….
२०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत जनतेने भाजप आणि शिवसेनेच्या युतीला मतदान केले होते. मात्र, शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला सोबत घेऊन सरकार स्थापन केले होते. महाराष्ट्रात चुकीचे सरकार स्थापन झाल्याने अस्वस्थ वाटत होते. मी मुख्यमंत्री झालो नाही याचे दुःख नव्हते, तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे व्हिजन समोर नेणारे सरकार महाराष्ट्रात आले नाही याचे दुःख होते. यामुळे योग्य वेळी योग्य गोष्टी करणार हे ठरवले होते. यासाठी लक्ष ठेवून होतो. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून वेगळ्या होण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांना सहकार्य करण्याचे आम्ही ठरवले. तसेच बाळासाहेबांचे विचार पुढे नेणाऱ्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्याचे ठरवले, असे फडणवीस याप्रसंगी म्हणाले.

फडणवीस म्हणाले, महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेच्या जोरावर इतर पक्ष मजबूत होत होते. यामुळे शिवसेनेच्या आमदारांमध्ये खदखद निर्माण झाली होती. यातूनच एकनाथ शिंदे यांनी उठाव करण्याचा निर्णय घेतला. कोणीतरी बाळासाहेबांचे विचार घेत वेगळा होण्याचा निर्णय घेतला. यामुळेच भाजपने एकनाथ शिंदे यांना सहकार्य करण्याचे ठरवले. आम्ही मुख्यमंत्रिपदासाठी आग्रह केला नाही. आग्रह केला असता तर मुख्यमंत्रिपद मिळाले असते. आमच्याकडे जास्त आमदार असतानाही शिवसेनेचाच मुख्यमंत्री करायचा होता. मी म्हटले म्हणून एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले.

गनिमी काव्याने महाराष्ट्रात पुन्हा सरकार आले
गेली अडीच वर्षे ही अनाचार, दुराचार, भ्रष्टाचार, अत्याचाराची गेली. राज्यात प्रशासन नावाची गोष्ट नव्हती. अनेक ‘राजे’ काम करत होते. कोण राज्य चालवतेय ते समजत नव्हते. सामान्य माणसाचे कुणी ऐकायला तयार नव्हते. आपण छत्रपती शिवरायांचे वंशज आहोत. ते आपले आराध्य दैवत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी जो गनिमी कावा आपल्याला सांगितला, त्याच गनिमी काव्याने आणि छत्रपतींसारखे निधड्या छातीने महाराष्ट्रात हे सरकार पुन्हा एकदा आले, असे असं फडणवीसांनी यावेळी नमूद केले.

Share