व्हॉट्सॲप स्टेटसवर स्वत:ला श्रद्धांजली वाहत तरुणाची आत्महत्या

सांगली : प्रेमभंग झालेल्या एका तरुण शेतमजुराने मोबाईलवरील व्हॉट्सॲप स्टेटसवर स्वत:चाच फोटो टाकून भावपूर्ण श्रध्दांजली वाहत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यातील नागठाणे येथे घडली. आत्महत्येपूर्वी या तरुणाने मोबाईलवरील व्हॉट्सॲप स्टेटसवर विरह गीताची ध्वनी चित्रफित प्रसारित केली होती.

वाळवा-खेड रस्त्यावरील एका गोठ्यामध्ये शेतमजुरीचे काम करणारा सुशांत भरत तोडके (वय २६) याने गोठ्यामध्ये गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्रकार सोमवारी (४ जुलै) सकाळी उघडकीस आला. सोमवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सुशांतने मोबाईलवर विरह गीत प्रसारित केले. त्यानंतर अर्ध्या तासाने त्याने स्वत:चा फोटो टाकून भावपूर्ण श्रध्दांजलीचा संदेश प्रसारित केला. तो ईशान गावडे यांच्या खोलीत भाड्याने वास्तव्यास होता. सुशांतचा भावपूर्ण श्रध्दांजलीचा संदेश पाहताच त्याच्या पालकांनी घरमालक गावडे यांना चौकशी करण्याची विनंती केली. गावडे यांनी शोधले असता गोठ्यात सुशांतने आत्महत्या केल्याचे समोर आले.

सुशांतने मोबाईलवर ”इतने अनमोल तो नही, लेकिन हमारी कदर याद रखना शायद हमारे बाद, कोई हम जैसा ना मिले” हे विरहगीत प्रसारित केलेले होते. सुशांतच्या आत्महत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Share