मुंबई : सोनाली बेंद्रे ही बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे. हिंदीसोबतच सोनालीने दाक्षिणात्य आणि मराठी सिनेमांमध्येही काम केले आहे. अभिनयासोबतच तिने आपल्या सौंदर्यानेही चाहत्यांची मनं जिंकली. सोनाली बेंद्रेने कर्करोगावर यशस्वीरित्या मात केली आहे. उद्याचा दिवस पाहणार की नाही, याची शाश्वती नसताना सोनालीने हिंमतीने कर्करोगाशी सामना केला आणि ती मरणाच्या दारातून परतली आहे. आता पुन्हा एकदा ती नव्या जोमाने कामाला लागली आहे.
बॉलिवूडमध्ये आपल्या सौंदर्य आणि अभिनयाने जादू निर्माण करणाऱ्या नायिकांमध्ये ९० च्या दशकात यशस्वी झालेली अभिनेत्री सोनाली बेंद्रे अनेकांची क्रश होती. अनेक हिट चित्रपट देणाऱ्या सोनालीच्या आयुष्यात एक असे वळण आले की, त्याने तिचे आयुष्यच बदलून गेले. एका दुर्मीळ कर्करोगाने तिला ग्रासले. अमेरिकेत उपचार घेऊन कॅन्सरवर मात करत सोनालीने मनोरंजन विश्वात पुन्हा पाऊल टाकले आहे.
सोनाली बेंद्रे नेहमीसारखे जीवन जगत असताना अचानक तिच्या आयुष्यात वादळ आले. तिला कर्करोग झाल्याचे निदान झाले आणि तिच्या पायाखालची जमीन सरकल्यासारखे झाले; परंतु सोनाली डगमगली नाही. न्यूयॉर्कमध्ये तिने कर्करोगावर उपचार घेतले. या कठीण काळात तिने फक्त सकारात्मक पद्धतीने विचार केला. उद्याचा दिवस पाहणार की नाही याची शाश्वती नसताना सोनालीने मोठ्या हिंमतीने या आजाराशी सामना केला. कर्करोगाशी लढा दिल्यानंतर आता तिचे जीवन पूर्ववत होत आहे. तिच्यासाठी हा संपूर्ण प्रवास सोपा नव्हता. या संपूर्ण प्रवासादरम्यानचा अनुभव सोनालीने सांगितला आहे.
‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीच्या ‘माझा कट्टा’ या कार्यक्रमात सोनाली बेंद्रेने हजेरी लावली होती. यावेळी तिने कर्करोगावर आपण मात कशी केली? जेव्हा कर्करोगाचे निदान झाले तेव्हा पहिली प्रतिक्रिया काय होती हे सांगितले. सोनाली बेंद्रे म्हणाली, ” मी कर्करोगाशी लढा दिला. माझ्या आयुष्यामध्ये घडलेली ही संपूर्ण घटना जर कोणाला प्रोत्साहन देत असेल तर ते खूप चांगले आहे. ज्या गोष्टीची भीती वाटते ती गोष्ट करा, असे बऱ्याचदा बोलले जाते. मी तेच केले. केस नव्हते; पण आज फक्त केस गळत आहेत. उद्या जगणार की नाही हेदेखील मला ठाऊक नव्हते. शिवाय जगले तरी पुढे माझा लूक कसा असेल याची कल्पनादेखील नव्हती. किमोथेरपीनंतर कित्येक रुग्णांचे रुप बदलेले आपण पाहिले आहे. किमोथेरपीमध्ये जरी लूक बदलला नाही तरी आपले वय वाढत आहे. लूक बदलणारच याची कल्पना होती. शिवाय ज्या क्षेत्रात मी काम करते तिथे दिसण्यावरच सगळे चालते आणि ते असायचा पाहिजे. कारण, तुम्ही कसे दिसता हे स्क्रिनच्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत पोहोचते. काहीही झाले तरी मी जगणारच, असा सकारात्मक विचार मी केला. मी माझ्या मुलालाही सांगितले की, शंभर टक्के मी पुन्हा येणार.”
https://www.instagram.com/p/Ceq654mqM43/?utm_source=ig_web_copy_link
”कर्करोग झाला हे समजताच मला नेहमी सकाळी उठल्यावर असे वाटायचे की, हे स्वप्न आहे; पण नंतर मी भानावर यायचे आणि कळायचे की, ही सत्य परिस्थिती आहे. माझ्याबाबतीतच हे का घडले? मीच का? असे अनेक प्रश्न माझ्या मनात गर्दी करत होते. मला कर्करोग झाल्याचे समजताच मी चौथ्या दिवशी उपचारासाठी भारताबाहेर गेले. माझ्या पतीने मला सांगितले, याक्षणी तू आयुष्यात दुसऱ्या कोणाचाही विचार करायचा नाही. फक्त तू आता तुझा विचार कर. माझ्या पतीबरोबर मी भारताबाहेर गेले. आम्ही डॉक्टरला भेटलो. तेव्हा सगळे रिपोर्ट पाहून डॉक्टर म्हणाले, तुझी फक्त ३० टक्केच जगण्याची शक्यता आहे. त्याचक्षणी मला असे वाटले की, डॉक्टरला एक बुक्का द्यावा. एवढा मला त्यांचा राग आला होता; पण यादरम्यानच्या काळात मी नकारात्मक गोष्टींपासून लांब राहिले, फक्त सकारात्मक विचार केला आणि मी मरणाच्या दारातून पुन्हा परत आले.”
सोनालीने दीड वर्षे अमेरिेकेत राहून कॅन्सरवरील उपचार घेतले. त्याकाळात ती सोशल मीडियावर कॅन्सरबाबत प्रबोधन करत होती. तिने अनेक अनुभवही शेअर केले. कॅन्सरवर मात करून ती पुन्हा तिच्या अभिनय क्षेत्राकडे वळली आहे. डीआयडी लिटिल मास्टर्स या रिअॅलिटी शोची जज म्हणून तिने कमबॅक केले. लवकरच सोनाली ‘द ब्रोकन न्यूज’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील सिनेमात डेब्यू करणार आहे. लोकप्रिय नायिका, कॅन्सरग्रस्त आई ते पुन्हा नव्या दमाची अभिनेत्री असा सोनालीचा हा संपूर्ण प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे.
https://www.instagram.com/p/CeoVgGepXSJ/?utm_source=ig_web_copy_link
सोनाली बेंद्रेने नुकत्याच एका मुलाखतीत २८ वर्षांपूर्वी नाईलाजास्तव केलेल्या एका गोष्टीचा खुलासा केला आहे. पैशांसाठी तिला मनाविरूध्द एक असे काम करावे लागले की, त्यावेळी तिच्यासमोर पर्याय नव्हता. तंबाखूजन्य पदार्थांचे कधीच समर्थन करणार नाही, असे सांगताना तिने २८ वर्षांपूर्वी बीअरची जाहिरात का केली याचा खुलासा केला आहे. ‘फिल्मफेअर’च्या या मुलाखतीत सध्या सेलिब्रिटी कलाकारांवर तंबाखूजन्य पदार्थांच्या जाहिरातीविषयी तिचे काय मत आहे यावर चर्चा सुरू होती. कलाकार काय करतात याचा समाजावर प्रभाव पडत असल्याने कलाकारांनी व्यसनांना प्रोत्साहन देणाऱ्या जाहिराती करू नयेत, असे मत सोनालीने व्यक्त केले. हे सांगताना तिने तिच्या बाबतीत घडलेली एक घटना सांगितली. सोनालीने तिच्या बॉलिवूडमधील सुरुवातीच्या दिवसात एक बीअरची जाहिरात केली होती. याविषयी खुलासा करताना सोनाली म्हणाली, आयुष्यात नाईलाजाने केलेली बीअरची ती एक जाहिरात सोडली तर मी कधीच तंबाबूजन्य पदार्थांचं समर्थन केले नाही. मग असे काय कारण होते की, सोनालीला बीअरची जाहिरात करावी लागली? याचेही उत्तर तिने या मुलाखतीत दिला आहे.
https://www.instagram.com/tv/Ccxg26hp-JY/?utm_source=ig_web_copy_link
सोनाली ९० च्या काळात एक लोकप्रिय अभिनेत्री होती. त्यावेळी ती मुंबईत भाड्याच्या घरात राहत होती. त्यावेळी तिला घराचे भाडे देण्यासाठी काही पैसे कमी पडत होते. त्याचदरम्यान तिच्याकडे बीअरच्या जाहीरातीची ऑफर आली. त्या जाहिरातीतून मिळालेल्या पैशांतून सोनालीने घराचे भाडे दिले; पण त्यानंतर तिने अशाप्रकारच्या तंबाखू, धूम्रपानाला प्रोत्साहन देणाऱ्या जाहिराती करायच्या नाहीत, असा निर्णय घेतला. या निर्णयावर ती आजही ठाम आहे.