मलिकांना दिलासा नाहीच , ४ एप्रिल पर्यंत कोठडीत वाढ

मुंबई- राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री यांना मनी लाँड्रींग प्रकरणी ईडीने चौकशी करत अटक केली होती. त्यांना न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळालेला नसल्याचं स्पष्ट झालं आहे. ईडीच्या विशेष न्यायालयाने मलिकांच्या कोठडीत ४ एप्रिल पर्यंत वाढ केली आहे.

गेल्या २३ फेब्रुवारीला ईडीचे अधिकारी नवाब मलिक यांच्या घरी पोहोचले. त्यांना सकाळीच ईडी कार्यालयात दाखल करण्यात आले होते. आठ तासांच्या चौकशीनंतर मलिकांना अटक करण्यात आली. त्याच दिवशी त्यांना ईडी कोठडी सुनावण्यात आली होती. दाऊदच्या माणसांकडून जमीन खरेदी केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. त्यांनी दाऊदची बहीण हसीना पारकर यांच्या हस्तकाकडून जमीन खरेदी केल्याचा आरोप ईडीने केला आहे. याप्रकरणी सध्या चौकशी सुरू आहे. न्यायालयाने यापूर्वी मलिकांच्या कोठडीत तीनदा वाढ केली असून आता देखील त्यांचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे. न्यायालयाने यापूर्वी मलिकांना २१ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. आज ही कोठडी संपणार होती. पण, न्यायालयाने परत एकदा मलिकांची रवानगी कोठडीत केली आहे.

दरम्यान, ईडीने अटक केल्याच्या विरोधात मलिक यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. ईडीची कारवाई चुकीची असल्याचा दावा त्यांनी केला होता. हे प्रकरण २२ वर्षांपूर्वीचे असल्याचेही त्यांनी म्हटले होते. न्यायालयाने मलिक यांची ही याचिका फेटाळून लावली होती. यामुळे मलिक यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. मलिक हे न्यायालयीन कोठडीत असून, त्यांना आता सुटकेसाठी रीतसर जामिनासाठी अर्ज करावा लागेल.

 

 

Share