मुंबई : मराठी चित्रपट व नाट्यसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ येत्या ४ जूनला वयाची ७५ वर्षे पूर्ण करणार आहेत. त्याचबरोबर त्यांच्या चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीला यंदा ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने त्यांच्या चाहत्यांमध्ये मोठा उत्साह पहायला मिळतो आहे. अशोक सराफ सध्या अष्टविनायक नाट्य संस्थेच्या ‘व्हॅक्यूम क्लीनर’ या नाटकात प्रमुख भूमिका साकारत आहेत. या नाटकाचा ४ जून (शनिवार) रोजी दादरमधील शिवाजी मंदिर नाट्यगृहात प्रयोग होणार असून, या प्रयोगाच्या मध्यांतरात अशोक सराफ यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे हा नाट्य प्रयोग आणि सत्कार सोहळ्यासाठी नाट्यरसिकांना विनामूल्य प्रवेश मिळणार आहे.
ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी आपल्या कसदार अभिनयाने गेली अनेक दशकं केवळ मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीच नाही तर हिंदी सिनेसृष्टीतही आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. अशोक सराफ म्हणजे अभिनयाचे खणखणीत नाणं असे समीकरण बनले आहे. शेकडो चित्रपट, नाटक, टीव्ही मालिका यामध्ये त्यांनी साकारलेल्या विविधांगी भूमिका चाहत्यांच्या मनात घर करून बसल्या आहेत. चित्रपट व नाट्यसृष्टीत लाडाने लोक त्यांना ‘अशोक मामा’ म्हणतात. अर्थात अभिनयातले ‘सम्राट’ म्हणूनही त्यांची वेगळी ओळख आहेच.
अशोक सराफ यांनी यंदा वयाची पंचाहत्तरी पूर्ण करीत आहेत. त्यानिमित्ताने अष्टविनायक नाट्यसंस्था आणि परिवारातर्फे शनिवारी ४ जून रोजी मुंबईतील दादर येथील शिवाजी मंदिर नाट्यगृहात सकाळी १०.३० वाजता ‘व्हॅक्यूम क्लीनर’ या नाटकाचा प्रयोग होणार आहे. या प्रयोगाच्या मध्यांतरादरम्यान अशोक सराफ यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. आपल्या या लाडक्या कलाकाराच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये सहभागी होण्याची संधी ‘अशोक मामा’ यांच्या चाहत्यांना मिळणार आहे.
‘व्हॅक्युम क्लीनर’ या नाटकात अशोक सराफ यांच्यासोबत अभिनेत्री निर्मिती सावंत यांची प्रमुख भूमिका आहे. चिन्मय मांडलेकर यांनी या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन केले आहे. कोरोनाचा काळ वगळता गेली चार वर्षे ‘व्हॅक्यूम क्लीनर’ हे नाटक अशोक सराफ यांच्या सहकार्याने रंगभूमीवर जोरात सुरू आहे. महाराष्ट्र, गोवा, इंदूर इत्यादी ठिकाणी या नाटकाचे आतापर्यंत ३०० हून अधिक प्रयोग झाले आहेत. सामाजिक बांधिलकीचे भान राखून कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ‘अष्टविनायक’ परिवाराने या नाटकाचे दोन प्रयोग सादर केले आहेत. त्यातून मिळालेला तीन लाख रुपये निधी संस्थेतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीला देण्यात आला आहे.
अशोक सराफ यांच्यासारख्या सहृदयी व गुणी कलाकाराचा त्यांच्या पंचाहत्तरीनिमित्त सन्मान करण्याचा योग ‘अष्टविनायक’ संस्थेच्या परिवाराला मिळत आहे. हे आमचे भाग्यच आहे, असे अष्टविनायक नाट्यसंस्थेचे ज्येष्ठ निर्माते दिलीप जाधव यांनी सांगितले.