औरंगाबाद : शहरासाठीची पाणी पुरवठा योजना, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक, पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाचे पुनरूज्जीवन यांसह जिल्ह्यातील तसेच पैठण मतदारसंघातील विविध महत्त्वपूर्ण विकास कामे, प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. औरंगाबाद पाणीपुरवठा योजनेसह या सर्व प्रकल्पांना निधी वेळेत उपलब्ध करून देण्याबाबतही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत सूचना केल्या. औरंगाबाद जिल्हा आणि पैठण मतदारसंघातील विविध विकास कामांबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत बैठक झाली. बैठकीला जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी ऑनलाइन उपस्थित होते.
सह्याद्री अतिथीगृहातील या बैठकीस पालकमंत्री संदीपान भुमरे, आ. संजय शिरसाट, सहकार अतिरिक्त मुख्य सचिव अनुपकुमार, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार सिंघल, गृह विभागाचे प्रधान सचिव संजय सक्सेना, वित्त विभागाच्या सचिव ए. शैला, जलसंपदा विभागाचे सचिव विलास राजपूत, औरंगाबाद महापालिकेचे आयुक्त अभिजीत चौधरी यांच्यासह महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पर्यटन तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, जायकवाडीच्या जलाशयातील उद्भव विहीरीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून काम लवकरात लवकर पूर्ण करावी. योजनेतील टप्प्याटप्पाने कामांची पूर्तता आणि आवश्यक निधीची मागणी याबाबत संबंधित विभागांनी समन्वयाने कार्यवाही करावी. जिल्ह्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्यावतीने सुरु असलेल्या कामांना वेग द्यावा. कामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करा, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
औरंगाबाद महापालिकेच्यावतीने साकारण्यात येणाऱ्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मारक व स्मृती वनाच्या कामास गती देण्यात यावी. या ठिकाणच्या पुतळ्याचे अंतिम आरेखन निश्चित करण्यात यावे. हे आरेखन सर्वोत्तम असावे, संग्रहालयात प्रदर्शित करावयाच्या माहितीबाबत तज्ज्ञांची नेमणूक करावी. स्व. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयीच्या आठवणी, माहिती मागवण्यात यावी. महापालिकेने या परिसरातील वनीकरण आणि अन्य कामे वेळेत पूर्ण व्हावीत, याकडे लक्ष पुरवावे अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या.
#औरंगाबाद जिल्हा आणि पैठण मतदार संघातील विविध विकास कामांचा मुख्यमंत्री @mieknathshinde अध्यक्षतेखालील आयोजित बैठकीत आढावा. बैठकीस रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री तथा औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री @SandipanBhumare , आमदार संजय शिरसाट आदी उपस्थित. pic.twitter.com/2mHPpn0TKF
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) November 18, 2022
पैठण येथील ज्ञानेश्वर उद्यानाचे पुनरूज्जीवन करण्याची आवश्यकता आहे. त्याचा पुनर्विकास होईपर्यंत ते तात्पुरत्या स्वरुपात पुन्हा लोकांसाठी खुले व्हावे यासाठी आवश्यक निधी जलसंपदा विभागास उपलब्ध करून देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिले. यावेळी जलसंपदा विभागाने या उद्यानाच्या पुनर्विकासाबाबत आंतरराष्ट्रीय सल्लागार नियुक्त केल्याची माहिती दिली. सुमारे १७५ एकरवरील या उद्यानात आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा या दृष्टीने पर्यटनस्थळ साकारण्यात येणार आहे. हे उद्यान पर्यटकांसाठी महत्त्वाचे स्थळ ठरेल, त्यादृष्टीने जलसंपदा, पर्यटन आणि वित्त विभागाने समन्वयाने उद्यानाचे पुनरूज्जीवन आणि पुनर्विकासाला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
पैठण येथे महावितरणचे विभागीय कार्यालय तसेच बिडकीन नवीन उपविभागांची निर्मिती, विहामांडवा येथे १३२ केव्ही उपकेंद्र निर्माण करणे, औरंगपूरवाडी, दरकवाडी, रहाटगाव व केकतजळगाव येथील उपकेंद्राच्या उभारणीबाबतही बैठकीत चर्चा झाली.
पोलिसांसाठी निवासस्थानांचा आराखडा तयार करा
पोलीस गृहनिर्माण योजनेतून पोलीस आयुक्तालयासाठी तसेच क्रांती चौक येथे ७८० निवासस्थाने व पोलीस अधीक्षक (ग्रामीण) करिता ४०५ निवासस्थाने बांधण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. यामध्ये मुख्यमंत्री एकनाश शिंदे यांनी पोलीस गृहनिर्माण मंडळाला तातडीने आराखडे तयार करण्याचे, तसेच त्याबाबतचे प्रस्ताव सादर करून या कामांला गती देण्याचे निर्देश दिले. विहामांडवा येथे नवीन पोलीस स्टेशन निर्मितीबाबतही चर्चा झाली.
कारखाना प्रकरणात सुनावणी घ्या
संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांविषयी साखर आयुक्त आणि कामगार आयुक्त यांनी कारखान्याचे जुने व्यवस्थापन, आताचे खासगी व्यवस्थापन तसेच कामगार या तिन्ही घटकांशी चर्चा करावी. यासंदर्भात आवश्यकता भासल्यास सुनावणी घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.