ठाणे : कल्याण-अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील माळशेज घाटात एस. टी. महामंडळाच्या एका बस वाहकाने दरीत उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी सकाळी घडली. कल्याणहून अकोलेकडे निघालेली बस माळशेज घाटात येताच वाहकाने बस थांबवून थेट दरीत उडी घेतली. गणपत मारुती इदे (वय ३५ वर्षे, रा. मुतखेल, ता. अकोले) असे या वाहकाचे नाव आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
राज्य परिवहन महामंडळाची अकोले (जि. अहमदनगर) आगाराची बस बुधवारी सकाळी कल्याण येथून अकोले येथे जाण्यासाठी निघाली होती. या बसमध्ये गणपत मारुती इदे वाहक म्हणून कार्यरत होते. बुधवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास ही एस. टी. बस माळशेज घाटात आली असताना वाहक गणपत इदे यांनी अचानक बस थांबवली. बस थांबताच त्यांनी बसमधून उतरून थेट दरीत उडी घेतली. या घटनेची माहिती टोकावडे पोलिसांना मिळताच पोलिस व स्थानिक नागरिकांनी दरीत वाहक गणपत इदे यांचा मृतदेह शोधून काढला आणि मुरबाड येथील शासकीय रुग्णालयात रवाना केला आहे.
मृत गणपत मारुती इदे हे अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील मुतखेल येथील रहिवासी होते. ते तीन वर्षांपासून अकोले आगारात वाहक म्हणून कार्यरत होते. मंगळवारी ते अकोले-कल्याण ही एस. टी. बस घेऊन गेले होते. माळशेज घाटात कपरीच्या महादेव मंदिराजवळ बस थांबताच गणपत इदे यांनी कड्यावरून खोल दरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. त्यांनी अचानक टोकाचे पाऊल उचलून आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन लहान मुले आहेत. दरम्यान, याप्रकरणी टोकावडे पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पोलिसांनी तपास सुरू केला आहे.