निलंगा/प्रतिनिधी – चार महिन्यापासून एस.टी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. राज्य शासनाकडे विलनीकरणासह विविध मागण्यांसाठी कर्मचारी संपावर असून अजूनही कर्मचाऱ्यांचा मागण्या मान्य केलेल्या नाहीत. तसेच हा मुद्दा न्यायालयात असल्याने निर्णय प्रलंबित होत आहे. त्यातच निलंगा येथील एका कर्मचाऱ्याला नौकरीतून बडतर्फ केल्याने तणावामुळे त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.
सतीश मधूकरराव चपटे (वय ४०) असे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. निलंगा आगारातील या यांत्रिकी कर्मचाऱ्याला एकतर्फी चौकशी करत कामावरून बडतर्फ करण्यात आले होते. त्यामुळे चपटे आर्थिक विवंचणेत सापडले असता त्या ताणावामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी , दोन मुले असा परिवार आहे.
निलंगा आगारातील अशा एकून ६८ कर्मचाऱ्यांवर बडतर्फची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे बहूतांश कर्मचारी हे सध्या तणावग्रस्त जीवन जगत असून त्यांच्या कुटुंबियावर उपासमारीची वेळ आली आहे.असे किती बळी जाण्याची वाट हे राज्य शासन बघणार आहे असा संतप्त सवाल नातेवाईकाकडून उपस्थित केला जात आहे. सतीश यांच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.