शक्कर बावडीतून गाळ उपसा थांबवा, न्यायालयाचे आदेश

औरंगाबाद : हिमायतबाग परिसरातील शक्कर बावडीमधील गाळ जेसीबीद्वारे उपसण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे. मात्र, हे काम तातडीने थांबवून तेथे पुढील आदेशापर्यंत कुठलीही कार्यवाही करू नये, असे अंतरिम आदेश बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे व न्या. अनिल पानसरे यांनी दिले.

यावेळी याचिकाकर्त्यांनी न्यायालयात आपली बाजू मांडताना म्हटले आहे की, हिमायतबाग हा परिसर जैवविविधतेने नटलेला वारसा स्थळाचा भाग आहे. यंत्राद्वारे गाळ काढण्यासारख्या कामामुळे वरील विहिरींना बाधा पोहचू शकते. या भागात कुठल्याही प्रकारचे यंत्र येणार नाही, याची काळजी घेण्यात यावी, अशी विनंती याचिकेद्वारे केली आहे. नवीन जलस्रोत तयार न करता हिमायतबागेतील ४०० वर्षापूर्वीचे जलस्रोत का वापरायचे, असा प्रश्नही याचिकेतून उपस्थित केला आहे. जैवविविधतेने नटलेल्या भागात यंत्राद्वारे काम करताना पर्यावरण विभागाचा अहवालही लागतो, आदी मुद्दे यावेळी याचिकाकर्त्यांनी न्यायालयात मांडले. याचिकाकर्त्यांची बाजून जाणून घेतल्यानंतर या प्रकरणाची पुढील सुनावणी ४ जुलै रोजी खंडपीठात ठेवण्यात आली आहे. तोपर्यंत कामाला स्थगिती देण्यात आलेली आहे.

 

Share