क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी प्रयत्नशील – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुणे : राज्यात खेळाच्या विकासासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा आणि प्रशिक्षक शासनातर्फे देण्यात येतील अस मत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं आहे. क्रीडा विकासासाठी कुठल्याही प्रकारची कमतरता भासू दिली जाणार नाही. खेळाडूंनी क्रीडा सुविधांचा लाभ घेऊन राज्याचा नावलौकिक जगात उंचवावा आणि राज्याचे नाव सातासमुद्रापार पोहोचवावे. खेळ आणि खेळाडूंच्या विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचे पुण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते.

शासनानं क्रीडा क्षेत्राला प्राधान्य दिले आहे. राज्यातील उत्कृष्ट खेळाडूंचा डाटाबेस तयार करीत आहोत. यामुळे भविष्यात चांगले खेळाडू घडविण्यास मदत मिळेल असेही मुख्यमंत्री म्हणाले. राज्यात १५५ क्रीडा संकुल असून त्यात आणखी १२२ संकुलांची भर घालण्यात येणर आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यशस्वी खेळाडुंच्या बक्षीसाच्या रकमेत पाच पट वाढ केली आहे. जागतिक नेमबाजी स्पर्धेत यश मिळवलेल्या ठाण्याच्या रुद्रांश पाटील याला दोन कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात आले. यातून खेळाडूंना प्रेरणा मिळेल. राज्याच्या क्रीडा संस्कृतीला चालना मिळेल असे मुख्यमंत्री म्हणाले.

जिद्द, कष्ट आणि चिकाटीच्या बळावर पदक मिळवा
राज्यात तालुका, जिल्हा आणि राज्य पातळीवर विविध स्पर्धांचे आयोजन होते. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचण्यासाठी हे टप्पे महत्त्वाचे आहेत. म्हणून खेळाडूंनी प्रत्येक टप्प्यावर जिद्द, कष्ट, चिकाटी दाखवली तर ऑलिम्पिकमध्ये नक्कीच यश मिळेल. अपयशी होणाऱ्या खेळाडूंनी खचून न जाता पुढील स्पर्धेत यश मिळविण्याची जिद्द बाळगावी. पुन्हा नव्या उत्साहाने खेळायला सुरूवात करावी. इंटरनेट-मोबाईलच्या जगात मैदानावर खेळणे अत्यंत आवश्यक आहे. खेळल्याने शरीर आणि मन कणखर होईल आणि आव्हाने पेलण्याची ताकद मिळेल.

स्पर्धा ही खेळाची दिंडी, झेंडा निराळा तरी रंग खेळाचा
ऑलिम्पिक शब्दात एक जादू आहे. स्पर्धेच्या निमित्ताने इथे खेळाची दिंडी आपण पाहतो आहे. प्रत्येकाच्या हातात वेगळा झेंडा असला तरी रंग एकच असतो, तो म्हणजे खेळाचा. म्हणून आपण खेळाडूंना महत्त्व देतो. १० हजारपेक्षा अधिक खेळाडूंचा या स्पर्धेत सहभाग आहे. सर्वाधिक पदके मिळविणाऱ्या जिल्ह्याला चषक प्रदान करण्यात येणार आहे असे सांगून उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी क्रीडा विभाग, महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक असोसिएशन आणि खेळाडूंचे अभिनंदन केले. गुजरातमध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत १४० पदके मिळवून आपल्या खेळाडूंनी प्रथम क्रमांक मिळवून दिला. त्याबद्दल त्यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. राज्य उद्योग किंवा पायाभूत सुविधेतच पुढे नाही तर आपले खेळाडूदेखील गुणवंत आहेत. आपल्याला नक्कीच ऑलिम्पिकमध्ये पदक मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

Share