भाजप आमदार जयकुमार गोरे यांना सर्वाच्च न्यायालयाचा झटका

भाजपा आमदार जयकुमार गोरे यांना सर्वोच्च न्यायालयाने जोरदार झटका दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने जयकुमार गोरे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यांच्यावर जमिनीची खोटी कागदपत्रे बनवून घोटाळा केल्याचा आरोप आहे. गोरे यांच्या याचिकेवर सरन्यायाधीश एन.व्ही. रमण्णा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या पूर्णपीठासमोर सुनावणी झाली. गोरे यांच्या प्रकरणात आरोपपत्र दाखल असल्याचे सरकार विकिलांनी न्यायालयात सांगताच गोरे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला.

सर्वोच्च न्यायालयाने गोरे यांना आधी कोर्टापुढे शरण येण्याचे आणि मग जामिनासाठी अर्ज करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे गोरे यांना आता वडूजच्या न्यायालयासमोर हजर राहून मगच जामिनासाठी अर्ज करता येणार आहे.

जयकुमार गोरे यांच्या विरोधात वडूज न्यायालयाने एका प्रकरणात अटकपूर्व जामीन फेटाळून लावला होता. त्यानंतर अटक टाळण्यासाठी गोरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. तिथेही त्यांना दिलासा मिळाला नाही. अखेर गोरे यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. मात्र, गोरे यांना सर्वोच्च न्यायालयातही दिलासा मिळू शकला नाही.

काय आहे प्रकरण?
आमदार जयकुमार गोरे यांच्यासह एकूण सहा जणांवर मायणी गावातील जमिनीबाबत खोटी कागदपत्रे तयार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी महादेव पिराजी भिसे यांच्या तक्रारीवरून आरोपींविरोधात दहिवड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे. विशेष म्हणजे जमिनीची खोटी कागदपत्रे बनवण्यात तलाठी देखील आरोपी आहे. आरोपी तलाठी सध्या फरार आहे.

Share