पुण्यात संशयित दहशतवाद्याला अटक; एटीएसची कारवाई

पुणे : ‘लष्कर-ए-तोयबा’ या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून आज दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) दापोडी परिसरातून एका तरुणाला अटक केली आहे. जुनैद मोहम्मद असे एटीएसने अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. विशेष न्यायालयाने त्याला ३ जूनपर्यंत एटीएस कोठडी सुनावली आहे.

अतिरेकी संघटनांना अर्थपुरवठा (टेरर फंडिंग) करण्याच्या प्रकरणाशी संबंध असल्याच्या संशयावरून जुनैद मोहम्मदला अटक करण्यात आली आहे. जुनेद मोहम्मद हा मूळचा बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथील रहिवासी असून, मागील दीड वर्षांपासून तो पुण्यात राहत होता. त्याचे शिक्षण मदरशात झालेले आहे. जुनैद मोहम्मद हा समाजमाध्यमाद्वारे काश्मीरमधील ‘गझवाते अल हिंद’ या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात आला होता. एक महिन्यापूर्वी त्याच्या बँक खात्यात पैसे जमा झाले होते. दरम्यान, तो या संघटनेच्या अधिक संपर्कात येत असल्याची माहिती पुणे दहशतवादी विरोधी पथकाला (एटीएस) मिळाली होती. मागील आठ दिवसांपासून जुनैद मोहम्मदची चौकशी सुरू होती. त्यानंतर तो चौकशीत दोषी आढळल्याने त्याच्याविरुद्ध सोमवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आज पहाटे त्यास दापोडी परिसरातून अटक करण्यात आली.

जुनैदने ‘लष्कर-ए-तोयबा’ साठी काम करण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप आहे. त्याला जम्मू-काश्मीरमधून पैसे मिळाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सोशल मीडियावरून तो दहशतवाद्यांच्या संपर्कात आला होता. तो जम्मू-काश्मीरमधील ‘लष्कर-ए-तोयबा’च्या नेत्यांच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे. याशिवाय तो दोन वर्षात सहा वेळा काश्मीरला गेल्याची माहिती समोर आली आहे.

आज दुपारी दोन वाजता जुनैद मोहम्मदला पुणे न्यायालयात हजर करण्यात आले. याबाबत जुनेदच्या वकिलांनी सांगितले की, जुनैदने वेगवेगळ्या ग्रुपच्या माध्यमातून दहशतवादी संघटना ‘लष्कर-ए-तोयबा’ साठी रिक्रुटमेंट तसेच त्यासाठी फंडिग गोळा करणे, महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणांची रेकी करायची असे काम जुनेदला देण्यात आले होते. ज्या ठिकाणची रेकी करण्यात आली ते या ठिकाणी काही हल्ल्याचा कट होता का? याची चौकशी पोलिसांना करायची आहे. जुनैदचे शिक्षण मदरशात झाले असून, तो वेगवेगळ्या ठिकाणी फिरलेला असल्याचेही वकिलांनी सांगितले. त्यामुळे तो नेमका कुठे राहत होता तसेच त्याने कुणाला रिक्रूट केले आहे का? त्याशिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातून काही लोकं भरती करण्याचा प्रयत्न झाला आहे का? या सर्वाची चौकशी एटीएसला करायची असल्याने त्याला एसटीएस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Share