निसर्ग जपला तरच शाश्वत विकास शक्य- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : वातावरणात होत असलेल्या बदलांमुळे विविध आपत्तींना तोंड द्यावे लागत आहे. निसर्गाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळे वसुंधरेची जपणूक करून शाश्वत विकासाकडे वाटचाल करावी लागणार आहे. यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे. आपण सर्वजण मिळून ही जबाबदारी पार पाडूया, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

वातावरणीय बदलाचे दुष्परिणाम रोखण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने विविध उपायोजना केल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून समृद्ध पर्यावरण निर्माण करण्यासाठी ‘माझी वसुंधरा अभियान 2.0’ हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राबविण्यात येत आहे. याअंतर्गत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या स्थानिक संस्था, विभागीय व जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांचा सन्मान जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आबासाहेब जऱ्हाड, सदस्य सचिव अशोक शिनगारे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, पर्यावरणात प्रत्येक घटक महत्वाचा आहे. आपण सर्वजण एक‍ टीम आहोत आणि सर्वांनी मिळून प्रयत्न केले तर कोणताही उपक्रम कसा यशस्वी होऊ शकतो याचे ‘माझी वसुंधरा अभियान’ हे उत्तम उदाहरण आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातील माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य यात सहभागी झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. विकास हा झालाच पाहिजे परंतु तो पर्यावरणाची जपणूक करून शाश्वततेकडे जाणारा असणे आवश्यक आहे. मागील काही वर्षांत कमी दिवसांत अधिक पाऊस पडतोय, दरडी कोसळत आहेत यामुळे होणाऱ्या हानीपासून पुढील पिढीचे आयुष्य सुखकर करण्यासाठी राज्य शासनाने प्रत्यक्ष पावले उचलली आहेत. त्यानुसार वसुंधरेची जपणूक करण्याचा आपला जुना संस्कार नव्याने रूजविण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

मुख्यमंत्री म्हणाले, विकास कशाला म्हणावे याचा विचार करण्याची वेळ आली आहे. आपण निसर्ग आणि त्यातील वन्यजीव जपत पुढे आलो आहोत, यांची उपयुक्तता लक्षात घेता हा वारसा पुढे नेण्याची आवश्यकता त्यांनी प्रतिपादित केली. झाडांपासून मिळणाऱ्या प्राणवायूची निकड कोविड काळात सर्वाधिक जाणवल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईसारखी समृद्ध वन्य जीवसृष्टी असलेले शहर जगात अन्यत्र कुठेही नाही याचा उल्लेख करून पर्यावरण रक्षणासाठी आज होत असलेल्या कामांची फळे कदाचित आता दिसणार नाही, तथापि पुढच्या पिढीला याचा निश्चित लाभ होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. निसर्गाची हाक ऐकण्याची वेळ आली आहे, माझी वसुंधरा अभियान हे असेच आपल्याला निसर्गाच्या जवळ घेऊन जाणारे अभियान असल्याचे त्यांनी सांगितले. या अभियानांतर्गत उत्कृष्ट काम केलेल्या सर्वांचे त्यांनी अभिनंदन केले.

Share