बाजारभावातील कांदा घसरण थांबवण्यासाठी उपाययोजना करा – छगन भुजबळ

नाशिक : कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत असून राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापलडला आहे. त्यामुळे कांदा बाजार भावातील घसरण थांबविण्यासाठी राज्य शासनाकडून उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

छगन भुजबळ यांनी दिलेल्या पत्रात म्हटले की, महाराष्ट्र हे भारतातील सर्वात मोठ्या प्रमाणावर कांदा पिकविणारे राज्य आहे. भारतातील एकुण कांदा उत्पादनात महाराष्ट्राचा ३३ टक्के वाटा आहे. शिवाय येथील कांद्याची प्रतही चांगली असल्याने निर्यातीमध्ये महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा आहे. महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सोलापूर, सातारा, अहमदनगर, धुळे, बुलढाण आणि जळगांव हे जिल्हे कांदा उत्पादनासाठी प्रसिध्द असुन महाराष्ट्रातील एकुण कांदा उत्पादनात नाशिक जिल्ह्याचा २९ टक्के वाटा आहे. कांदा उत्पादनात महाराष्ट्राचे मोठे योगदान असूनही येथील शेतकऱ्यांना दाराच्या बाबतीत योग्य न्याय मिळत नसल्याची खंत भुजबळ यांनी व्यक्त केली आहे. सर्वसाधारणपणे हा कांदा नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगांव, नंदुरबार व औरंगाबाद या सहा जिल्ह्यातून विक्रीस येतो. आलेल्या कांदा आवकेपैकी ७०ते ८०टक्के कांदा हा निर्यातयोग्य असल्याचाही उल्लेख पत्रामध्ये आहे.

दरम्यान, रब्बी हंगामात गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, कर्नाटक व पश्चिम बंगाल या राज्यांसह महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सोलापुर या जिल्ह्यात कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाल्याने देशांतर्गत कांद्याची मागणी घटलेली आहे. त्यातच बांग्लादेशाने कांदा आयातीवर निर्बंध लादले आहेत व श्रीलंकेत आर्थिक परीस्थिती निर्माण झाल्यामुळे कांद्याची निर्यात ठप्प झालेली आहे. भारताच्या या दोन्ही प्रमुख आयातदार देशांमध्ये भारतीय कांदा निर्यात होत नसल्याने मागणी अभावी कांद्याची बाजारभावात दिवसेंदिवस घसरण होत आहे.

Share