नेमबाजी विश्वचषकात भारताला सांघिक गटात सुवर्णपदक

कैरो- इजिप्त येथील कैरोमध्ये सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्वचषकामध्ये भारतीय महिला नेमबाजी संघाने जबरदस्त खेळाचं प्रदर्शन केलं आहे. रविवारी झालेल्या स्पर्धेत राही सरनोबत, ईशा सिंह आणि रिदम सांगवान या भारतीय महिलांच्या संघाने २५ मीटर पिस्टल टीमच्या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे.

आयएसएसएफ विश्वचषकामध्ये भारतीय महिला नेमबाजी संघाने रोमांचक अंतिम लढतीत १७-१३ ने विजय मिळवून भारताला तिसरे सुवर्णपदक जिंकून दिले. तत्पूर्वी भारतीय महिला संघाने १० मीटर एअर पिस्टल टीम स्पर्धेमध्येही सुवर्णपदक जिंकले होते. या टीममध्ये ईशा सिंह, निवेता पी आणि रुचिता विनेरकर यांचा समावेश होता. त्यांनी जर्मनीला पराभूत करून पदक जिंकले होते. तर रविवारी सकाळी श्रीयंका सांडगी आणि अखिल शेरोन यांनी ५० मीटर रायफल थ्री पोजिशंस मिश्र टीम गटात कांस्य पदक जिंकले होते.

ईशा सिंह हिने आतापर्यंत तीन पदके जिंकली आहेत. रविवारी तिने दुसरे सुवर्णपदक जिंकले. तत्पूर्वी तिने महिलांच्या १० मीटर एअर पिस्टल टीम गटात सुवर्णपदक जिंकले. त्याआधी तिने १० मीटर एअर पिस्टल वैयक्तिक गटात रौप्य पदक जिंकले आहे. आता पदकतक्त्यामध्ये भारतीय संघ पाच पदकांसह दुसऱ्या स्थानी आहे. भारतासाठी सौरभ चौधरीने पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्टल गटामध्ये सुवर्णपदक जिंकले होते. तर ईशा सिंहने महिलांच्या १० मीटर एअर पिस्टलमध्ये रौप्यपदक जिंकले आहे.

Share