कार्यकाळ संपला, आजपासुन जिल्हा परिषदेवर प्रशासक राज

औरंगाबाद : जिल्हा परिषद ही मिनी मंत्रालय म्हणून ओळखली जाते. औरंगाबादच्या जिल्हा परिषदेचा कार्यकाळ २० मार्च रोजी संपला आहे. त्यामुळे आजपासून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे हे प्रशासक म्हणून काम पाहणार आहेत.

जिल्ह्यातील ९ पंचायत समित्यांवर १४ मार्चपासून गट विकास अधिकारी प्रशासक म्हणून काम पहात आहेत. औरंगाबाद महापालिकेवर मागील दोन वर्षांपासून प्रशासक राज आहे. आता जिल्हा परिषद देखील प्रशासकांच्या ताब्यात गेली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील समस्या वेगाने सोडवल्या जातील की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच जिल्हा परिषदेचा कार्यकाळ संपलेल्या सदस्यांचे लक्ष निवडणूक आयोगाच्या पुढील घोषणेकडे लागले आहे. सध्या राज्यातील सर्वच महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. पुढील किमान तीन महिने तर निवडणुका होणार नाहीत, अशी शक्यता आहे. मात्र त्यानंतर नियोजित वेळात निवडणुका घेतल्या जाव्यात, अशी आशा राजकीय पक्ष आणि सदस्यांना आहे. तोपर्यंत तरी जिल्हा परिषदेवरील प्रशासकराजचा अनुभव सर्वांना घ्यावा लागणार आहे.

Share