… म्हणूनच गांधीजींसारखा बहुदा दुसरं कोणी होणे नाही – राज ठाकरे

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गांधी जयंती जयंतीनिमित्त सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये राज ठाकरे यांनी महात्मा गांधी यांची प्रशंसा केली आहे. गांधींजींचा प्रभाव असा काही पसरत गेला की, फक्त भारतच नव्हे तर जवळपास तीन खंडातील देशांमध्ये स्वातंत्र्याची आस जागृत झाली आणि ब्रिटिश राजवटीचा सूर्य मावळला. पण जे गांधीजींना जमलं ते पुढे जवळजवळ कोणालाच जमलं नाही. असं राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

राज ठाकरे महात्मा गांधीजींबद्दल नेमकं काय म्हणाले?

महात्मा गांधी हे गेल्या शतकातील एकमेव असं नेतृत्व असेल की, जे देशांच्या सीमा तोडून पसरत गेले. तेही इंटरनेट, सोशल मीडिया, मोबाईल नसताना. गांधींजींचा प्रभाव असा काही पसरत गेला की, फक्त भारतच नव्हे तर जवळपास तीन खंडातील देशांमध्ये स्वातंत्र्याची आस जागृत झाली आणि ब्रिटिश राजवटीचा सूर्य मावळला. पण जे गांधीजींना जमलं ते पुढे जवळजवळ कोणालाच जमलं नाही. विशिष्ट राजकीय-सामाजिक परिस्थितीत प्रबळ वाटणारे नेते आले, कमालीचे लोकप्रिय झाले आणि पुढे काही वर्षातच मागे पडलेले दिसले आहेत. दुसरं महायुद्ध जिंकल्यावर चर्चिल, जगाला फॅसिझमच्या विळख्यातून सोडवणारा तारणहार म्हणून पुढे आले, पण त्यांची लोकप्रियता पुढे झपाट्याने ओसरली.

ह्याला कारण चर्चिल ह्यांचं योगदान एका विशिष्ट परिस्थितीला पूरक होतं, ते चिरकाल टिकावं असं नव्हतं. पण गांधीजींचं तत्वज्ञान व्यापक होतं. शृंखला मग त्या अज्ञानाच्या असोत, की गुलामगिरीच्या, वसाहतवादाच्या की जातींच्या, त्या शृंखलांनी कुठल्याही माणसाला बांधून ठेवण्याचा अधिकार कोणालाच नाही, कारण सगळी माणसं ही मुळात समान आहेत, इतकं सोपं तत्व त्यांनी स्वीकारलं आणि त्यासाठी त्यांनी संघर्ष केला. हे खूप कठीण आणि दुर्मिळ आहे, म्हणूनच गांधीजींसारखा बहुदा दुसरं कोणी होणे नाही. आज महात्मा गांधी जयंती. गांधीजींच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन.

तसंच, ‘आज देशाचे दुसरे पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री ह्यांची जयंती. लालबहाद्दूर शास्त्री ह्यांची पंतप्रधानपदाची कारकीर्द तशी अल्प होती, पण पंतप्रधान असताना आणि त्या आधी गृह, संचार व परिवहन, व्यापार, उद्योग अशा अनेक खात्यांमध्ये शास्त्रीजींनी खूप मोलाची कामगिरी केली होती. पण ह्याबद्दल फारसं बोललं गेलं नाही.

१९५७ ते १९६४ ह्या काळात देशातील धार्मिक दंगलींवर त्यांनी नियंत्रण आणलं, संघराज्यातून फुटून जाण्याची इच्छा बाळगणाऱ्या शक्तींना वेळीच रोखलं, विशाखापट्टणम येथे जहाज बांधणीचा कारखाना उभारला, रशिया व चेकोस्लोव्हाकिया यांच्या सहकार्याने राष्ट्रीय औद्योगिक विकास निगम स्थापन केला. स्वतःच्याच पक्षातील बड्या नेत्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून राजीनामा द्यायला लावला. थोडक्यात शास्त्रीजी हे उत्तम प्रशासक होते आणि त्यांनी ते वेळोवेळी दाखवून दिलं. पण शास्त्रीजींची कारकिर्द काहीशी झाकोळली गेली. असो, इतक्या प्रखर राष्ट्रभक्त नेत्याचं योगदान देश विसरूच शकत नाही. लालबहाद्दूर शास्त्रींच्या कारकिर्दीला सलाम आणि त्यांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच अभिवादन.

Share