मलिकांवरील ‘ईडी’ने केलेली कारवाई तात्काळ मागे घ्यावी – आ. भांबळे

परभणी : राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांच्यावरील कारवाई ही सूडबुद्धीने करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या ‘ईडी’ने ही कारवाई हेतुपूर्वक केली असून ती तात्काळ मागे घ्यावी, ही मागणी जिंतूरचे आमदार विजय भांबळे यांनी केली आहे.

मंत्री नवाब मलिक महाविकास आघाडीचे महत्वपूर्ण नेते आहेत. ते सरकारमध्ये अल्पसंख्याक व वक्फ विकासमंत्री या नात्याने उत्कृष्ट कार्य करत आहेत. त्यांनी आजपर्यंत भाजपची अनेक काळी कृत्ये जनतेसमोर आणल्याने खवळलेल्या भारतीय जनता पक्षाने आता ‘ईडी’ची मदत घेत त्यांचे तोंड दाबण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. मागील काळात अनेक भ्रष्ट अधिकाऱ्यांचे काळे धंदे त्यांनी उजेडात आणल्याने त्यांच्यावर मुद्दाम अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

आम्ही महाविकास आघाडीतील सर्व पक्ष मंत्री नवाब  मलिक पाठीशी ठाम उभे राहू. देशात कोणत्या स्तराचे राजकारण केले जात आहे, याची जनतेला कल्पना आहे. या घाणेरड्या राजकारणाचा आम्ही निषेध करतो. या संबंधीचे एक निवेदन तहसीलदारांना सादर करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share