मराठा आमदार, मंत्र्यांनी आंदोलनात सहभागी व्हावे अन्यथा राजीनामे द्यावेत!

मालेगाव-  खासदार संभाजीराजे भोसले यांनी आजपासून आझाद मैदानावर बेमुदत उपोषणास सुरुवात केली आहे. त्यांना पांठिबा देण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वपक्षीय मराठा समाजाचे आमदार, खासदार व केंद्र तसेच राज्यातील मंत्र्यांनी उपस्थित रहावे. महाराजांच्या चरणी नतमस्तक होवून त्यांच्या मागण्या तत्काळ मंजूर कराव्यात अन्यथा आपापल्या पदांचा राजीनामा द्यावा, असे आवाहन भाजप नेते अद्वय हिरे यांनी समाजाच्या सहविचार सभेत केले.

पुढे बोलताना हिरे म्हणाले, की राज्यातील कोणत्याही पक्षीय सरकार मराठा समाजाच्या आमदारांशिवाय होत नाही, हे वास्तव आहे. महाराष्ट्रात मराठा समाजाच्या आरक्षणासह रास्त मागण्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज उपोषणास बसत आहेत, ही समाजाच्या लोकप्रतिनिधींसाठी लाजीरवाणी बाब आहे. सकल मराठा समाजाने मतदान केलेल्या लोकप्रतिनिधींना जाब विचारावा. त्यांना छत्रपतींच्या उपोषणात सहभागी होण्यास भाग पाडावे.

सकल मराठा समाज बांधवांनी आझाद मैदानात जनसंख्येचा महापूर आणावा. रेल्वे, गाड्या व मिळेल त्या वाहनांनी मुंबई गाठावी, पोलिस प्रशासन जर आडकाठी घालत असेल तर त्या ठिकाणी रस्ते जाम करावेत. नाशिक येथील जिल्हा समन्वय बैठकीत जिल्ह्यातील एकही मराठा आमदार- खासदार उपस्थित नव्हता, ही खेदाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. ओबीसी आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले होते. तरीही राज्य सरकारने राजकीय फायद्यासाठी न्यायालयाचा आदेश झुगारुन राज्यपालांकडून अध्यादेशावर स्वाक्षरी घेऊन निवडणुकांत ओबीसी आरक्षण मंजूर करुन घेतले. त्याच धर्तीवर मराठा समाजाच्या आरक्षणाबाबात राज्य शासनाने सकारात्मक भूमिका घेऊन मराठा समाजास तत्काळ आरक्षण द्यावे, अन्यथा सकल मराठा समाज सरकार उलथवून टाकेल, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला.

Share