राज्याचे मुख्यमंत्री हे खरे पर्यावरणवादी नेते- आदित्य ठाकरे

मुंबई : मुंबई वातावरण कृती आराखडा अहवाल हा येत्या काही दशकांसाठी सर्वात महत्त्वाचा दस्तावेज ठरणार आहे. आरेचे ८०८ एकर जंगल वाचण्याचे संपूर्ण श्रेय राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे आहे. तसेच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे खरे पर्यावरणवादी नेते आहेत असे कौतुक पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले आहे.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते काल सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे मुंबई वातावरण कृती आराखडा अहवालाचे लोकार्पण करण्यात आलेय यावेळी पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त  इकबाल सिंह चहल आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आदित्य ठाकरे बोलत होते.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, एका बाजूला जगाचा कोविड विषाणूशी लढा सुरू असताना दुसऱ्या बाजूला वातावरणीय बदलाची समस्यादेखील तीव्र होत आहे. या समस्येवर तातडीने उपाय करण्याची गरज लक्षात घेऊन जागतिक संस्थांबरोबर मिळून मुंबई आणि महाराष्ट्र काम करीत आहे. महाराष्ट्राची अर्धी लोकसंख्या शहरांमध्ये वास्तव्यास असून या सर्व शहरांनी मुंबईप्रमाणेच वातावरण कृती आराखडा तयार करून अंमलात आणणे आवश्यक आहे. त्यामध्ये सर्व लोकप्रतिनिधींना सहभागी होऊन विस्ताराने काम करावे लागेल, अशी अपेक्षा मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली.

गेल्या दहा वर्षात राज्यात आणि देशात मोठे बदल झाले आहेत. जिथे दुष्काळ होता तेथे आता पूर येत आहेत. जेथे पूर येत होता, तेथे दुष्काळ पडत आहे. मुंबईतही खूप बदल होत आहेत. अलिकडे मुंबईत मार्च महिन्यातच पाऊस पडत आहे. लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही आमच्या मतदारसंघातील विषय कॅबिनेटमध्ये मांडत असतो. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे नुकसान भरपाई मागत असतो. परंतु, वातावरणामुळे हे नुकसान होत आहे, याचा विचार होणे आवश्यक आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

Share