पुढील महिन्यात देशाला मिळणारे नवे राष्ट्रपती; राष्ट्रपती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

नवी दिल्ली : भारताचे विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ येत्या २४ जुलै रोजी संपत आहे. भारतीय निवडणूक आयोगाने आज गुरुवारी (९ जून) राष्ट्रपती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार १८ जुलै रोजी राष्ट्रपतीपदासाठी मतदान होईल व २१ जुलै रोजी दिल्लीत मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येईल.

देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी भारताच्या सर्वोच्च घटनात्मक पदासाठी म्हणजे राष्ट्रपतीपदासाठीचा निवडणूक कार्यक्रम आज दिल्लीत जाहीर केला. १५ जून रोजी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात येईल. राष्ट्रपती निवडणूक १८ जुलै रोजी होईल. या निवडणुकीत यंदा एकूण ४,८०९ जण मतदान करतील. विशेष म्हणजे कोणत्याही पक्षाला या निवडणुकीसाठी व्हिप जारी करता येणार नाही. या निवडणुकीत मतदानासाठी विशेष शाई असलेले पेन देण्यात येईल. मतदान करताना लोकप्रतिनिधींना १,२,३ असा पसंतीक्रम ठरवता येईल. पहिली पसंती न सांगितल्यास मत रद्द ठरवले जाईल, असे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांना व्हिप जारी करता येणार नाही. संसद आणि विधानसभेत मतदान होईल. राज्यसभेचे महासचिव निवडणूक प्रभारी असतील. या निवडणुकीत कोरोना प्रोटोकॉल पाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

असा आहे राष्ट्रपती निवडणूक कार्यक्रम
अधिसूचना (नोटिफिकेशन) जारी –१५ जून २०२२
उमेदवारी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस –२९ जून २०२२
उमेदवारी अर्जाची छाननी –३० जून २०२२
अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस –२ जुलै २०२२
मतदानाचा दिवस –१८ जुलै २०२२
मतमोजणी –२१ जुलै २०२२

विधानसभा, लोकसभा व राज्यसभा सदस्यांनाच मतदानाचा अधिकार
विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी संपत आहे. त्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश नवनिर्वाचित राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ देतील. राष्ट्रपतीपदासाठी सर्वसामान्यांना मतदानाचा अधिकार नसतो. केवळ विधानसभा आणि लोकसभा व राज्यसभेवर निवडून आलेले लोकप्रतिनिधीच या निवडणुकीत मतदान करू शकतात. त्यांच्या मतांचे मूल्य विजयी उमेदवार ठरविते. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एका खासदाराच्या मताची किंमत ७०० असणार आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या खासदारांनाही मतदान करता येणार आहे. तुरुंगात असणारे खासदार पॅरोलसाठी अर्ज करू शकतात. त्यांना पॅरोल मंजूर झाल्यास त्यांनादेखील या निवडणुकीत मतदान करता येणार आहे.

राष्ट्रपतीपदासाठी भाजपतर्फे कोण उमेदवार असणार?
राष्ट्रपतीपदाची निवडणूक जाहीर झाल्याने आगामी काही दिवसांत राजकीय हालचालींना वेग येणार आहे. राष्ट्रपतीपदासाठी केंद्रातील सत्तारूढ भारतीय जनता पक्षातर्फे कोण उमेदवार असणार याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच घेतील. यंदा भाजप राष्ट्रपतीपदासाठी महिला उमेदवारांना प्राधान्य देईल, अशी चर्चा आहे. केंद्र व अनेक राज्यांत सत्ता असलेल्या भाजपकडे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतील इलेक्ट्रोरल कॉलेजमधील सर्वाधिक मते असली तरी निवडून येण्यासाठीचे आवश्यक संख्याबळ भाजपकडे नाही. त्यामुळे भाजप कोणती रणनीती आखणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवाय, विरोधी पक्षांकडून राष्ट्रपतीपदासाठी कोण उमेदवार राहणार? राष्ट्रपतीची निवड बिनविरोध करण्याची परंपरा यावेळी कायम राहणार की, प्रत्यक्ष निवडणूक होणार? याबाबत उत्सुकता आहे.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत खासदारांच्या मतांच्या किमतीचे वेगळे गणित असते. यामध्ये सर्व राज्यांच्या विधानसभा सदस्यांच्या मतांचे मूल्य जोडले जाते. या एकत्रित मूल्याला राज्यसभा आणि लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येने भागले जाते. अशा प्रकारे मिळालेली संख्या ही खासदाराच्या मताचे मूल्य असते. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत सर्वाधिक मते मिळणे हे विजय निश्चित करत नाहीत. मतदारांच्या एकूण मतांपैकी निम्म्याहून अधिक म्हणजे खासदार आणि आमदारांच्या मतांचे मूल्य प्राप्त करणारा उमेदवार भारताचा राष्ट्रपती होतो. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी इलेक्टोरल कॉलेजच्या सदस्यांच्या मतांचे एकूण मूल्य १०,९८,८८२ आहे. उमेदवाराला विजयासाठी ५,४९,४४४ मते मिळणे आवश्यक आहे. २०१७ च्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत जवळपास ५० टक्के मते राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) च्या बाजूने होती. म्हणजेच एकूण ४ हजार ८८० मतदारांपैकी ४ हजार १०९ आमदार आणि ७७१ खासदारांनी मतदान केले होते. गेल्या वेळी राष्ट्रपतीपदासाठीची निवडणूक १७ जुलै २०१७ रोजी झाली होती. त्यात रामनाथ कोविंद यांची भारताचे १४ वे राष्ट्रपती म्हणून निवड झाली होती.

Share