कत्तलीसाठी नेताना ८ गायींचा ट्रकमध्ये गुदमरून मृत्यू; संतप्त नागरिकांनी पेटवला ट्रक

बुलडाणा : कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या ८ गायींचा ट्रकमध्ये गुदमरून मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा येथे समोर आला आहे. या घटनेनंतर संतप्त जमावाने ट्रक पेटवून दिला. नांदुरा शहरात ३१ मे रोजी मध्यरात्री ही घटना घडली. त्यामुळे नांदुरा परिसरात तणाव निर्माण झाला असून, वरिष्ठ पोलिस अधिकारी शहरात तळ ठोकून आहेत.

प्राप्त माहितीनुसार नांदुरा येथून मलकापूरकडे जाणारा ट्रक (क्र. एम. एच. ०४/एच. ई. १८९०) नांदुरा शहरातील दिवाणी न्यायालयासमोर बिघडल्याने बंद पडला. यावेळी नागरिक जमा झाल्याने ट्रकचालक व क्लीनरने घटनास्थळावरून पळ काढला. नागरिकांना संशय आल्याने नागरिकांनी ट्रकमध्ये पाहिले असता ट्रकमध्ये २५ गोवंशाची जनावरे कोंबून भरल्याचे दिसले. नागरिकांनी सर्व गायींना ट्रकच्या बाहेर काढले असता गुदमरल्याने ८ गायींचा मृत्यू झाल्याचे समोर आले. यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी सदर ट्रक पेटवून दिला.

या घटनेची माहिती मिळताच नांदुरा शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाला पाचारण करून ट्रक विझवण्यात आला. भररस्त्यात हा प्रकार घडल्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही तास खोळंबली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता दंगा नियंत्रण पथक व अतिरिक्त पोलिस दल नांदुऱ्यात तैनात करण्यात आले आहे. वरिष्ठ पोलिस अधिकारी नांदुरा येथे तळ ठोकून आहेत. दरम्यान, याप्रकरणी १ जून रोजी पहाटे ट्रकचालक व क्लीनरविरुद्ध प्राण्यांचा छळ केल्याच्या कारणावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share