अहमदनगर : पहिला डोस हा राज्यसभेचा होता, दुसरा डोस विधान परिषदेचा होता, तर आता भाजप राज्य सरकारला बूस्टर डोस देण्याच्या तयारीत आहे. या तिसऱ्या बूस्टर डोससाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असे आवाहन भाजपचे आमदार प्रा. राम शिंदे यांनी केले. महाविकास आघाडीवर निशाणा साधताना प्रा. राम शिंदे यांनी हे विधान केले.
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल्याचे दिसत आहे. आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकार यांना बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे राज्यातील ठाकरे सरकार कोसळणार की तरणार? याकडे लक्ष लागले आहे. अशातच राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारच्या भवितव्याबाबत भाजपचे नेते आणि विधान परिषदेचे सदस्य प्रा. राम शिंदे यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.
प्रा. राम शिंदे यांची विधान परिषदेवर निवड झाल्याबद्दल अहमदनगर जिल्हा भाजपच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकसंदर्भात नियोजन करण्यात आले. याप्रसंगी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आ. प्रा. राम शिंदे म्हणाले, राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपने सर्व जागा जिंकून महाविकास आघाडीला दणका दिला. त्यानंतर भाजप आता महाविकास आघाडी सरकारला बूस्टर डोस देण्याच्या तयारीत आहे. यामुळे जिल्ह्यात आता कोणी पक्ष सोडून जाणार नाही. आपल्या जिल्ह्यातील दोन जिल्हा परिषद सदस्यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आता ते तोंडावर आपटले असतील. येत्या काळात भाजपचे पूर्ण ताकदीने राज्यात सरकार येणार आहे, असेही आ. प्रा. शिंदे म्हणाले.
राज्यात आणि देशात जेव्हा केव्हा पोटनिवडणुका होतात तेव्हा भाजपचे सरकार पुन्हा येताना दिसते. अहमदनगर जिल्ह्यात यापेक्षा वेगळे वातावरण राहणार नाही. आणखी एक आमदार जिल्ह्यात वाढणार आहे. आता चार आमदार झाले आहेत. पक्ष नेतृत्वाने घेतलेला निर्णय आपल्याला उपयोगात आणायचा आहे, असे त्यांनी सांगितले.