महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षाची सुनावणी पुन्हा लांबणीवर, ‘या’ तारखेला सुनावणी होणार

नवी दिल्ली : राज्यातील सत्तासंघर्षावरील सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणीला सुरुवात झाल्यानंतर घटनापीठाने दोन्ही पक्षकारांना लिखित स्वरुपात बाजू मांडण्याचे आदेश दिले. त्यासाठी घटनापीठाने ४ आठवड्यांची मुदत देऊ केली आहे. त्यामुळे आता ही सुनावणी २९ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

कोर्टात आज काय घडले?
सदर खटल्यात सुनावणीपूर्वी दोन्ही पक्षांच्या मुद्द्यांच्या नोंदी आम्हाला ठेवायच्या आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांनी संकलित स्वरुपात एकत्र फाइल तयार करण्याच्या सूचना सुप्रीम कोर्टाने शिंदे आणि ठाकरे गटाच्या वकिलांना दिल्या आहेत.

दोन्ही बाजूंच्या कनिष्ठ वकिलांना ही प्राथमिक मांडणी करता येईल. तसेच लिखित स्वरुपाच्या संकलनाचा दुसरा भागही ते सादर करू शकतील.

कोण कोणत्या मुद्द्यावर युक्तिवाद करणार, हे दोन्ही बाजूंनी एकत्रितपणे ठरवावे. यात २५ मुद्दे अर्थात भरमसाठ मुद्दे नसावेत. एकमेकांचे मुद्दे ओव्हरलॅप होतील, अशा प्रकारे मुद्दे मांडू नयेत, अशा स्पष्ट सूचना कोर्टाने दिल्या आहेत.

नोंदी ऐकणे आणि नोंदी ठेवण्यात वेळ जातो, त्यामुळे लिखित स्वरुपातील या नोंदी आम्हाला जास्त मदत करू शकतील, असे कोर्टाने म्हटले.

यानंतर कोर्टाने दोन्ही पक्षकारांना ही कागदपत्र सादरीकरणासाठीची मुदत तुम्हीच ठरवा, असे सांगितले. दोन्ही वकिलांनी तीन आठवड्याची मुदत मागितली.

पुढील सुनावणीची तारीख २९ नोव्हेंबर रोजी ठरवली जाईल, असे कोर्टाने म्हटले.

दरम्यान, आजच्या सुनावणीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, याप्रकरणाची सुनावणी महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थ्यांच्या निवडणुकीपूर्वी यासाठी आम्ही आग्रही आहोत. याप्रकरणात जाणुनबुजून वेळकाढूपणा केला जात आहे का, अशी शंका काहीजण उपस्थित करत आहेत. त्यावरही आज न्यायमूर्तींकडून स्पष्टीकरण देण्यात आले. या प्रकरणाचा निकाल लोकशाहीच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे काही गोष्टी व्यवस्थितरित्या करणे गरजेचे आहे, असे घटनापीठाकडून सांगण्यात आले.

Share