महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर उद्या पुन्हा होणार सुनावणी

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्ता संर्घषाच्या वादात आज सर्वोच्च न्यायलयात सुनावणी पार पडली. यावेळी शिवसेना आणि शिंदे गटाने जोरदार युक्तिवाद केला. सरन्यायाधीशांनी सर्व युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर उद्या गुरुवारी सकाळी १०.३० वाजता सुनावणी घेणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे आजचा निर्णय हा उद्यावर गेला आहे.

उद्धव ठाकरे गटाचा युक्तिवाद काय?
ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी आज सुप्रीम कोर्टात शिंदे गटाकडून करण्यात आलेले दावे खोडून काढले. विधिमंडळात आमच्याकडे दोन तृतीयांश बहुमत आहे. त्यामुळे आम्हीच खरी शिवसेना आहोत, असे म्हणता येणार नाही. विधिमंडळात बहुमत म्हणजे अवघा पक्ष त्यांचा असं होऊ शकत नाही. मग अशा बहुमताच्या जोरावर सरकारे पाडली जातील. त्यामुळे दहाव्या परिशिष्टाला अर्थ राहणार नाही, असं कपिल सिब्बल कोर्टात म्हणाले. त्यानंतरही शिवसेनेतून बाहेर गेलेल्या नेत्यांनी भाजपमध्ये किंवा इतर पक्षात विलीन होणं अथवा नवा पक्ष स्थापन करणं हाच पर्याय असल्याचं कपिल सिब्बल यांनी म्हटलं.

शिंदे गटाकडून कोर्टात काय युक्तिवाद?
एकनाथ शिंदे गटाकडून उद्धव ठाकरेंच्या यांच्या वकिलांनी केलेले दावे खोडून काढण्यात आले. आम्ही मुळात शिवसेनेतून बाहेरच पडलो नाहीत. त्यामुळे दुसऱ्या पक्षात विलीन होण्याचा प्रश्नच येत नाही. तसेच आमदारांविरोधात व्हिप उल्लंघन केल्याचं म्हटलं जातंय, मात्र विधिमंडळ बैठकीत व्हिप लागू होतो. पक्षाच्या बैठकीसाठी नाही, असे शिंदे गटाचे वकील हरिश साळवे म्हणाले. तसेच पक्षांतर बंदी कायद्याचा उल्लेख केला जातोय. मात्र त्यासाठी पक्ष सोडावा लागतो. शिंदे गटाने अद्याप शिवसेना सोडलेली नाहीये. तसेच एखाद्या गटाला पक्षाचे नेतृत्व मान्य नसेल तर तसे सांगण्यात काय गैर आहे? नेत्याने विश्वास गमावल्यानंतर पक्षांतर बंदी कायद्याचा आपल्याच सदस्यांविरोधात वापर करणं चुकीचं आहे, हरिश साळवे म्हणाले.

Share