मुंबई : कल्पना अनेक सुचतात, पण त्या प्रत्यक्ष अंमलात येतात, तो क्षण आनंदाचा असतो. मराठी नाट्य सृष्टी, रंगभूमीचा इतिहास यांचे संग्रहालय व्हावे, याची कल्पना काही काळापासून माझ्या मनात होती आणि ती लवकरच मराठी नाट्य विश्व इमारतीच्या रुपाने प्रत्यक्ष साकारणार आहे, याचा मनापासून आनंद होतो आहे, असे उद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले.
गिरगाव येथील बिर्ला क्रीडा केंद्राच्या जागी पुनर्विकास करून ‘मराठी नाट्य विश्व’ ही नाट्यगृह व मराठी रंगभूमी संग्रहालय इमारत उभारली जाणार आहे. त्याच्या बोधचिन्हाचे अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. मराठी नाट्य विश्वाच्या इमारतीची संकल्पना चित्रफित देखील यावेळी सादर करण्यात आली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, नाट्यसृष्टी हे महाराष्ट्राचे वैभव आहे. नाटक हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून ते सामाजिक वेदना-व्यथा यावर नेमके बोट ठेवून उपाय शोधण्यास प्रवृत्त करणारे माध्यम आहे. काळाच्या पाऊलखुणा जपणे हे महत्त्वाचे काम असते. त्यामुळे मराठी नाट्यसृष्टी व रंगभूमीचा इतिहास सांगणारी मराठी नाट्य विश्वाची इमारत कागदावरुन आता प्रत्यक्षात जमिनीवर साकारणार आहे, याचा आनंद आहे. तसा माझा नाटकांशी काही थेट संबंध नाही, पण माझ्या आजोबांनी सामाजिक समस्यांवर नाटके लिहिली होती. त्याकाळी ठाकरेंना थिएटर मिळू नये म्हणूनदेखील प्रयत्न व्हायचे आणि मिळालेच थिएटर तर, ते अतिशय अस्वच्छ, आतमध्ये कचऱ्याचे ढिगारे, उंदीर आणि घुशी यांचे साम्राज्य असायचे, अशी आठवण सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले, प्रत्येक राज्याचे एक वैशिष्ट्य असते. महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालला नाटकांची मोठी व अभिमानास्पद परंपरा आहे. त्यामुळे माझ्या मनात काही काळापासून नाट्य संग्रहालयाची कल्पना होती, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी मनोगत व्यक्त करताना मराठी नाट्य विश्वाची वैशिष्ट्ये सांगितली. ते म्हणाले, गिरगाव येथील बिर्ला क्रीडा केंद्र असलेला भूखंड राज्य शासनाच्या अखत्यारीत आहे. त्यावर स्थित क्रीडा केंद्र इमारत मोडकळीस आल्यामुळे सन २००० मध्ये ते बंद करण्यात आले. सुमारे ३ लाख ५० हजार चौरस फूट क्षेत्रावर विस्तारलेल्या या केंद्राचा दोन टप्प्यांमध्ये, मराठी रंगमंच कला दालनासाठी एकमेवाद्वितीय अशा स्वरूपात पुनर्विकास करून तिथे ‘मराठी नाट्य विश्व’ या नावाने नाट्यगृह व मराठी रंगभूमी संग्रहालय असा एकत्रित प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची त्यांनी यावेळी सांगितले.