औरंगाबाद : शहरात काल एकाच दिवशी तीन खुनाच्या घटना उघडकीस आल्या होत्या. यापैकी हिमायतबाग कट्टा परिसरातील डोंगराच्या पायथ्याशी आढळून आलेल्या मृतदेहाचा खुलासा झाला आहे. मृतदेहाची ओळख पटू नये म्हणुन आरोपीने मृतदेह जाळला होता. त्यामुळे या खुनाचा तपास करणे आणि मृतदेहाची ओळख पटविणे याचे आव्हान पोलीसांसमोर होते. पण पोलीसांनी वेगाने तपासचक्र फिरवत एका दिवसातच या हत्येचा शोध लावला आहे. याप्रकरणी आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. बहिणाला सतत मारहाण करणाऱ्या भाऊजीची साल्याकडून हत्या करण्यात आल्याच पोलीस तपासात समोर आले आहे. सुधाकर नारायण चिपटे (वय.४३, रा.सांगले कॉलनी) असे मृताचे नाव असून, राजेश संतोष मोळवडे असे आरोपीचे नाव आहे.
याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, सुधाकर चिपटे एका खाजगी वाहनावर चालक म्हणून काम करायचा. त्याला दारूचे व्यसन असल्याने तो नेहमी दारू पिऊन पत्नीशी वाद घालून तिला मारहाण करायचा. दरम्यान सहा महिन्यापूर्वी राजेश मोळवडे बहिणीच्या शेजारीच भाड्याच्या घरात राहण्यासाठी आला होता. यावेळी बहिणीला भाऊजीकडून सतत होणारी मारहाण पाहून त्याला प्रचंड राग यायचा. त्यामुळे त्याने भाऊजीचा गेम करण्याचं ठरवलं. त्यानुसार शनिवारी रात्री घरी कोणी नसल्याची संधी पाहून राजेशने सुधाकर यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार केले. ज्यात सुधाकरचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर राजेशने सुधाकरची हत्या केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी शक्कल लढवली. आधी सुधाकरचा मृतदेह पांढऱ्या गोणीत टाकला. त्यांनतर गोणीवर आणखी एक पोत चढवत मृतदेह मोपेडवरून घेऊन हिमायबागमध्ये पोहचला. मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून पेटवून दिला. पण मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास जवळच असलेल्या एका फार्म हाउसवरील कामगार हा लघुशंकेसाठी उठला असता, त्यांना आग लागल्याचे दिसले. त्यांनतर हा सर्व प्रकार समोर आला.
सीसीटीव्हीत कैद झाला आरोपी…
मृतदेह जाळल्यानंतर याची ओळख पटविणे हे पोलिसांसमोर मोठं आव्हान होत. पोलीसांनी शोध सुरु केला आणि लच्छु पहेलवान यांच्या फार्महाऊसवरील सीसीटीव्हींची तपासणी केली. यात एक युवक स्कुटीवर गोणी घेऊन जात असल्याचे दिसले. मात्र यात गाडीचा अर्धाच भाग दिसत होता. पोलीसांनी आणखी शोध घेत यामधील आरोपीची ओळख पटविली. आरोपी स्पष्ट होताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.