नव्या वर्षात बेकायदा सरकार घरी गेलेले दिसेल; राऊतांचं नवं भाकीत

मुंबई : १६ आमदारांना अपात्र ठरविण्याबाबतचा खटला आता सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे व सर्व काही कायद्यानेच झाले तर आमदारांसह मुख्यमंत्री शिंदे अपात्र ठरतील व नव्या वर्षात राज्यातील बेकायदा सरकार घरी गेलेले दिसेल असं नवीन भाकीत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी वर्तवलं आहे. नववर्षाच्या निमित्ताने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या रोखठोक सदरातून शिंदे- फडणवीस सरकार निशाणा साधला आहे.

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार पाडलं हा राजकीय बळजोरीचा प्रकार होता. शिवसेनाही फोडण्यात आली. सत्तेच्या गैरवापराचं हे उदाहरण. हे सर्व मावळत्या वर्षात घडलं. मावळत्या वर्षात महाराष्ट्रानं एक बेकायदेशीर सत्तांतर पाहिलं. लोकशाही व भारतीय घटनेचा कोणताही विधिनिषेध न बाळगता राजकारण करणारे देशाला अराजकाकडं ढकलत आहेत. १६ आमदारांना अपात्र ठरविण्याबाबतचा खटला आता सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे व सर्व काही कायद्यानेच झाले तर आमदारांसह मुख्यमंत्री शिंदे अपात्र ठरतील व नव्या वर्षात राज्यातील बेकायदा सरकार घरी गेलेले दिसेल, असं भाष्य संजय राऊतांनी केलं आहे.

आज लोकशाही, स्वातंत्र्य यांची मुंडकी उडवूनच राज्य चालले आहे. नव्या वर्षात तरी देशातील लोकशाही व स्वातंत्र्याची कवचकुंडले मजबूत होवोत. कारण संकुचित मानसिकतेची सर्व लक्षणे सध्याच्या राज्यकर्त्यांत दिसत आहेत. सर्वत्र जात, धर्म आणि त्यावरून तणाव हे चित्र परवडणारे नाही. हिंदू आणि मुसलमानांत कायमचे वैर हे देशाला नव्या फाळणीकडे ढकलत आहे. जगात कोणीच अमर नाही हे लक्षात घेतले तर मोदी व शहांनी देशात द्वेषाची आणि फाळणीची बीजे रोवू नयेत. राममंदिराचा प्रश्न निकाली निघाला, त्यावर आता मते मिळणार नाहीत. तेव्हा ‘लव्ह जिहाद’च्या मुद्दय़ावर मोर्चे व आंदोलने सुरू केली गेली अशी टीकाही राऊतांनी केली.

Share