मुंबई : एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. एकनाथ शिंदेच्या बंडामुळे महविकास आघाडी सरकार पडेल अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहेत. सध्या जवळपास ४० आमदारांसह एकनाथ शिंदे हे गुवाहाटी येथील एका हॉटेलमध्ये थांबले आहेत. ते भाजपसोबत जात सत्ता स्थापन करणार असल्याचं सांगितलं जातंय. अशात काल शिवसेना खा. संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांसमोर बोलताना देवेंद्र फडणवीसांना या फंदात पडू नका असा सल्ला दिला. यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिले आहे.
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट मध्ये म्हटलं की, “वड्याचं तेल वांग्यावर काढण्याच्या झमेल्यात सर्वज्ञानी संपादकांनी पडू नये, कर्माची फळे भोगताना “सुख मानण्यावर आहे” या मुख्यमंत्र्यांच्या उपदेशाचे स्मरण करावे आणि आनंदात रहावे”, असे ट्विट चित्रा वाघ यांनी केले आहे.
वड्याचं तेल वांग्यावर काढण्याच्या झमेल्यात सर्वज्ञानी संपादकांनी पडू नये…
कर्माची फळे भोगताना
"सुख मानण्यावर आहे" या मुख्यमंत्र्यांच्या उपदेशाचे स्मरण करावे आणि आनंदात रहावे…. @rautsanjay61 pic.twitter.com/QYV84JoLgm— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) June 25, 2022
नेमकं संजय राऊत काय म्हणाले ?
आज हजारो शिवसैनिक आमच्या पाठिशी उभे आहेत. पैसा, दहशतवादाच्या जीवावर आम्हाला कोणी विकत घेऊ शकणार नाही. त्यामुळे मी देवेंद्र फडणवीसांना सल्ला देतो की तुम्ही या फंदात पडू नका, जे पहाटे झालं ना ते आता सायंकाळी होईल, भाजपची उरलीसुरली प्रतिष्ठा ते यात गमावून बसतील. तुमच्या नेतृत्वाला धक्का बसेल. ते विरोधी पक्षनेते आहेत. जरी ते आमचे राजकीय विरोधक असले तरी तरी त्यांच्याविषयी आम्हाला प्रेम आहे. असा सल्ला संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांनी दिला.