ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांच्या समर्थनार्थ शक्तिप्रदर्शन

ठाणे : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंड पुकारलेल्या शिवसेना आमदारांच्या समर्थनार्थ एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी आज शनिवारी (२५ जून) ठाण्यात जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यावेळी खा. श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर जवळपास ५० आमदारांचा विश्वास आहे. एवढ्या सगळ्या आमदारांनी त्यांच्यावर विश्वास का ठेवला, याचा पक्षनेतृत्वाने विचार करावा, असे खा. श्रीकांत शिंदे यावेळी उद्धव ठाकरेंना उद्देशून म्हणाले.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर त्यांच्या समर्थनार्थ शनिवारी सायंकाळी शिंदे यांच्या ठाणे येथील लुईसवाडी भागातील निवासस्थानाबाहेर शिंदे समर्थकांनी ‘आम्ही भाई समर्थक’ असे पोस्टर्स हातात घेत मोठ्या प्रमाणात एकत्र येत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. ‘नेता कैसा हो, एकनाथ शिंदे जैसा हो..’, ‘एकनाथ भाई तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ हो’, अशा घोषणांनी ठाणे दुमदूमून गेले होते. एकनाथ शिंदे यांना समर्थन देण्यासाठी ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के, शिवसेनेचे अनेक नगरसेवक, सेना पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी आक्रमक शैलीत भाषण करत बंडखोर आमदारांचे समर्थन केले.

आम्ही आनंद दिघे यांच्या विचारांनी चालतो, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनाच आव्हान
प्रामाणिक शिवसैनिकांची माथं भडकविण्याचे काम सुरू आहे. दोन-चार लोक ऑफिसवर दगड फेकतात. हिम्मत असेल तर समोर या, असे आव्हान खा. श्रीकांत शिंदे यांनी दगडफेक करणाऱ्या सेना कार्यकर्त्यांना दिले. शिंदेसाहेबांमुळे आपण शांत आहोत. इथे मोगलाई माजली काय? हा महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रात धमक्या खपवून घेतल्या जाणार नाहीत. आम्ही आनंद दिघे यांच्या विचारांनी चालतो, असे म्हणत एकप्रकारे त्यांनी शिवसेनेला आणि पर्यायाने उद्धव ठाकरे यांनाच आव्हान दिले.

https://fb.watch/dSR-QFow5Q/

खा. श्रीकांत शिंदे म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर जवळपास ५० आमदारांचा विश्वास आहे. एवढ्या सगळ्या आमदारांनी त्यांना पाठिंबा का दिला, याचा विचार पक्षनेतृत्वाने करावा. मुख्यमंत्री लोकांना भेटत नाहीत. त्याचवेळी शिंदेसाहेबांचे दरवाजे सगळ्या आमदारांसाठी उघडे होते. कोरोना काळात त्यांनी जीवाची पर्वा न करता काम केले. ५० आमदारांच्या मनात ‘मविआ’ सरकारबद्दल खदखद आहे. सत्तेत असूनही निधी मिळत नाही. नेते कार्यकर्त्यांची कामे होत नाहीत. आमदारांची खदखद मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातली होती. अडीच वर्षे पक्ष वाढला नाही तर खाली गेला. कोरोना काळात सर्व पक्षाच्या नगसेवकांना निधी देण्याचे काम पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. हा आघाडी धर्म आहे; पण शिवसेनेला दाबण्याचे काम राष्ट्रवादीकडून झाले आहे, असा आरोप खा. शिंदे यांनी केला. इतिहासात इतका असंतोष कधी नव्हता. तो सत्तेत आल्यापासून झाला आहे. याचा विचार व्हायला पाहिजे होता. आम्ही आजही शिवसेनेतच आहोत. आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलेलो नाही. सगळ्या आमदारांच्या मनातील खदखद पक्षनेतृत्वाने समजून घ्यावी. आमदारांच्या बंडाबाबत गंभीर विचार व्हावा, असेही ते म्हणाले.

सत्तेत असतानाही निधी मिळत नाही
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व शिवसैनिकांना ‘शिवसंपर्क अभियाना’साठी पाठवले होते. त्यावेळी आमदार दिलेल्या ठिकाणी गेले. यावेळी शिवसैनिकांनी आपले दु:ख व्यक्त केले. महाविकास आघाडीत दम घुटत असल्याचे सांगितले. यातून बाहेरून पडले पाहिजे, असे सांगितले. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सत्ता आल्यानंतर राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी व नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पाठवले होते. यावेळी सामान्य नागरिकांनी नाही तर आमदारांनी तेथील खरी परिस्थितीची माहिती दिली. आम्हाला निधी दिला जात नाही. आमच्या मतदारसंघातील भूमिपूजन राष्ट्रवादी काँग्रेसचा पालकमंत्री करतो, असे आमदारांनी सांगितल्याचे खा. श्रीकांत शिंदे म्हणाले. आम्हाला निधी मिळाला तर ते थांबवण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसचे पालकमंत्री करतात. आम्ही विरोधात आहोत, निधी मिळत नाही असे आधी सांगत होतो. मात्र, आता सत्तेत असतानाही निधी मिळत नाही. मग काम कसे करायचे? लोकांना न्याय कसा द्यायचा? काय फायदा अशा सत्तेचा? असे प्रश्न खा. शिंदे यांनी यावेळी उपस्थित केले.

मुख्यमंत्र्यांना परिस्थितीची माहिती देऊनही दुर्लक्ष 
आम्ही शिवसंपर्क अभियानावरून परत आल्यानंतर दिल्लीला बैठक झाली. यावेळी आमच्याकडून सर्व माहिती घेण्यात आली. लेखीही लिहून घेतले. तेव्हा आम्ही सामान्य कार्यकर्त्यांची महाविकास आघाडीत घुसमट होत असल्याचे सांगितले. त्यांच्यासाठी काहीतरी करा, त्यांना न्याय मिळवून द्या, असेही म्हटले होते. हे आम्ही मुख्यमंत्र्यांना वारंवार सांगत होतो; पण त्यांनी दुर्लक्ष केले, असे श्रीकांत शिंदे म्हणाले.

ऊस खरेदीतही राष्ट्रवादी काँग्रेसकडून भेदभाव
सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात साखर कारखाने आहेत. या साखर कारखान्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. या साखर कारखान्यात ऊस नेला तर तू कोणत्या पक्षाचा असे शेतकऱ्यांना विचारले जाते. शिवसेना म्हटले तर सर्वांत शेवटी उसाची खरेदी केली जाते. माल खरेदी केला नाही तर ते शेतकऱ्यांना जाळावा लागतो. अशी परिस्थिती शिवसेनेची झाली आहे, असेही श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

Share