मुंबई- पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाला मोठ यश मिळाल आहे. चार राज्यांमध्ये भाजपाचं सरकार स्थापन होणार आहे. गोव्यात तीन अपक्षांच्या मदतीने भाजपा सत्तास्थापनेचा दावा करणार आहे. या विजयानंतर मुंबईत आलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट मुंबई महानगर पालिका निवडणुकांचे बिगुल वाजवले आहे. “खरी लढाई तर मुंबईत होणार आहे. मुंबईला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून मुक्त करायचं आहे”, असं फडणवीस म्हणाले आहेत.
गोव्यामध्ये ४० जागांपैकी २० जागांवर भाजपाचे उमेदवार जिंकून आले आहेत. तर काँग्रेसला फक्त ११ जागांवर विजय मिळवता आला आहे. बहुमतासाठी आवश्यक असलेली १ जागा अपक्षांच्या मदतीने पूर्ण करून भाजपा सत्तास्थापनेसाठी दावा करणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत भाजपाकडून मोठ्या प्रमाणावर शक्तीप्रदर्शन करण्यात आलं आहे.
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, लढाई अजून संपलेली नाही. खरी लढाई मुंबईत होईल. मुंबईला कुठल्या पक्षापासून मुक्त करायचं नाही, तर आम्हाला मुंबईला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून मुक्त करायचं आहे. आम्ही कुठल्या पक्षाच्या विरोधात नाहीत. मुंबई महानगर पालिकेला भ्रष्टाचाऱ्यांच्या विळख्यातून बाहेर काढत नाही, तोपर्यंत दम घेता येणार नाही. मुंबईचा प्रचंड विजय आणि महाराष्ट्रात भाजपाचं पूर्ण बहुमताचं सरकार तयार करण्यासाठी आपण सज्ज राहावं, असं फडणवीस यावेळी म्हणाले आहेत.