शिंदे सरकार फेब्रुवारी महिना पाहणार नाही; राऊतांचा दावा

नाशिक : राज्यातील शिंदे- फडणवीस सरकार फेब्रुवारी महिना पाहणार नाही, असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. ते नाशिक येथे प्रसार माध्यामांशी बोलत होते.

संजय राऊत म्हणाले की, १६ आमदार अपात्र ठरतील. केवळ वेळकाढूपणाचं धोरण स्वीकारलं आहे. सरकार व्हेटिलेटरवर असून ते सर्वोच्च न्यायालयाने काढलं तर हे राम होईल. कुणी त्यांच्यासोबत राहणार नाही. आता हे सरकार कधी उलथवायचं आणि निवडणुकांना सामोरे जायचं याची प्रतिक्षा राज्यातील जनता करतेय. अधिवेशन काळात सरकारचा जो गोंधळ होता तो जवळून पाहता आला. रोज एका मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे प्रकरण समोर येऊनही सरकार गेंड्याच्या कातडीप्रमाणे बसून होतं. या राज्यात सरकार अस्तित्वात नाही असं त्यांनी सांगितले.

त्याचसोबत अनेक प्रकरण अधिवेशन काळात समोर येऊनही सरकार पाण्यात बसलेल्या म्हैशीसारखे जणू काही घडलेच नाही आणि विरोधी पक्षच जबाबदार आहे अशा पद्धतीने काम करते. पूर्वी हायकोर्टाने ताशेरे मारले तरी मंत्री राजीनामा द्यायचे. पण एका अधिवेशनात मुख्यमंत्र्यांसह ६ मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची पुराव्यासह प्रकरण समोर आली तरी सरकार ठोंब्याप्रमाणे बसून आहे. ४० आमदारांसाठी हे सरकार आहे असा टोला संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लगावला.

Share