जगातील सर्वात वृद्ध महिला काळाच्या पडद्याआड

टोकियो : जगातील सर्वात वृद्ध महिला अशी ओळख असलेल्या जपानमधील रहिवासी केन तनाका यांचे नुकतेच वयाच्या ११९ व्या वर्षी निधन झाले. केन तनाका या जगातील सर्वात वृद्ध महिला होत्या. १९०३ मध्ये जन्मलेल्या तनाका यांचे नाव ‘जगातील सर्वात वृद्ध महिला’ म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदले गेले आहे. २५ एप्रिल रोजी केन तनाका यांचा मृत्यू झाला.

जपानच्या फुकुओका प्रांतातील रहिवासी असलेल्या केन तनाका यांचा जन्म पहिले महायुद्ध सुरू होण्याच्या ११ वर्षांपूर्वी म्हणजे २ जानेवारी १९०३ रोजी झाला होता. केन तनाका यांच्या जन्मानंतर केवळ वर्षभरातच रशिया-जपान युद्ध सुरू झाले. २०१९ मध्ये केन ११६ वर्षांच्या असताना त्यांना गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती म्हणून ओळख दिली. दीर्घ काळ जगणाऱ्या व्यक्तींमध्ये केन तनाका यांची नोंद झाली आहे.

‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ वेबसाईटनुसार, केन तनाका यांनी १९२२ मध्ये वयाच्या १९ व्या वर्षी विवाह केला होता. या जोडप्याने एक नूडल्सचे दुकान चालवत आपला उदरनिर्वाह भागवला. १९३७ मध्ये सुरू झालेल्या दुसऱ्या चीन-जपानी युद्धात केन यांचा पती आणि मोठा मुलगा यांनी भाग घेतला होता. वयाच्या ९० व्या वर्षी केन तनाका यांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन झाले तर वयाच्या १०३ व्या वर्षी त्यांच्यावर कोलोरेक्टल कॅन्सरची शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. केन तनाका या खूप हुशार होत्या. त्यांचा स्वभाव शांत होता. प्रकृती चांगली असताना त्या अनेक खेळही खेळायच्या. त्या एका नर्सिंग होममध्ये राहत होत्या.

केन तनाका यांनी जीवनात बराच संघर्ष केला आहे. त्यांनी त्यांच्या आयुष्यात दोनदा कर्करोगाचा पराभव केला आहे आणि १९१८ मध्ये स्पॅनिश फ्लू आणि आता कोविड-१९ सारख्या दोन साथीच्या रोगांचाही सामना केला आहे. जेव्हापासून त्यांच्या निधनाची बातमी पसरली तेव्हापासून लोकांना त्यांच्या दीर्घायुष्याचे रहस्य जाणून घ्यायचे होते. तनाकाच्या काही चांगल्या सवयींमुळे ती इतके दीर्घायुष्य जगू शकली.

दीर्घायुष्यासाठी अशी होती केन तनाका यांची दिनचर्या :-

पहाटे लवकर उठण्याची सवय
केन तनाका या सकाळी लवकर उठत असत. त्या रोज सकाळी सहा वाजता उठायच्या. संशोधनात असे दिसून आले आहे की, जे लोक सकाळी लवकर उठतात, ते लवकर झोपतात आणि आयुष्याचा आनंद घेतात. सकाळी लवकर उठण्याची सवय तुमच्या झोपेची गुणवत्ता वाढवते, ज्यामुळे तुमचा मूड आणि एकाग्रतेची पातळी सुधारते. एवढेच नाही तर लठ्ठपणा आणि इतर जुनाट आजारांचा धोकाही कमी होतो.

सतत वाचण्याची सवय
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, वयाच्या ११९ व्या वर्षीही तनाका रोज दुपारी अभ्यास करत असत. गणिताचे प्रश्न सोडवणे ही त्यांची सर्वात चांगली सवय होती. त्यामुळे त्याचा मेंदू सक्रिय राहण्यास खूप मदत झाली. नियमितपणे काहीतरी वाचल्याने स्मृतिभ्रंश होण्याचा धोका कमी होतो, जो वयानुसार वृद्धांमध्ये दिसून येतो. अभ्यासानुसार, वाचनामुळे तुमचे लक्ष, स्मरणशक्ती आणि संवाद कौशल्य सुधारते. एवढेच नाही तर ताण कमी करून दीर्घकाळ जगण्यास मदत करू शकते.

दीर्घायुष्यासाठी सकस, स्वच्छ अन्न खाणे आणि नियमित व्यायाम आवश्यक
या सर्वांशिवाय सकस आणि स्वच्छ अन्न खाणे आणि नियमित व्यायाम करणे देखील दीर्घायुष्यासाठी प्रभावी ठरते. तनाका गेल्या १२ वर्षांपासून रिटायरमेंट होममध्ये राहत होत्या. त्यांना काही प्रमाणात ऐकू येत नसे. तसेच त्या व्हीलचेअर वापरत होत्या. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अशा परिस्थितीतही मन सक्रिय राहण्यासाठी त्या छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये व्यस्त राहात होत्या.

Share