वर्ष बदलले; प्रश्न कायम! सर्वसामान्यांच्या बजेटला दे धक्का

मुंबई : केंद्र सरकार कडून काल सिलिंडर दरवाढ करण्यात आली आहे. यावरुन ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधण्यात आला आहे. नव्या वर्षाच्या सूर्योदयालाच केंद्र सरकारने विविध क्षेत्रांतील नवे नियम आणि बदलांचा दणका देत सर्वसामान्यांच्या बजेटला ‘दे धक्का’ दिला आहे, असं म्हणत सरकारच्या कामकाजावर टीका करण्यात आली आहे.

देशभरात सर्वत्र नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत झाले. पर्यटनस्थळे, समुद्रकिनारे, मंदिरे, गडकिल्ले, हॉटेल्स नागरिकांच्या गर्दीने आणि उत्साहाने न्हाऊन निघाले होते. नव्या वर्षाच्या संकल्पांची देवाणघेवाण झाली. राज्यकर्त्यांनीही शुभेच्छा देताना २०२३ मध्ये जनतेच्या आशाआकांक्षांची नक्की पूर्तता होईल, या आश्वासनाचे फुगे नेहमीप्रमाणे आकाशात सोडले. जनतेनेही या आतषबाजीचा एका अपेक्षेने आनंद लुटला, मात्र नवीन वर्षाचा पहिला सूर्योदय झाला आणि सरकारनेच या फुग्यांना टाचणी लावल्याचे उघड झाले, असं म्हणत केंद्र सरकारच्या धोरणांवर सामनातून टीका करण्यात आली आहे.

नव्या वर्षाकडे आशेने पाहणाऱ्या सामान्य नागरिकांचा या बातमीने अपेक्षाभंग केला आहे. १ जानेवारीपासून बँका, विमा, टपाल खाते आणि इतर अनेक क्षेत्रांत नवे नियम लागू होणार असून त्यामुळे सामान्य माणसाच्या खिशावरील बोजा वाढणार आहे. २०२२ मध्ये वर्षभर नोकर आणि वेतन कपात, वाढती महागाई, रोजगार निर्मितीवरील संकट आणि त्यातून निर्माण झालेले आर्थिक प्रश्न अशा समस्यांच्या गर्तेत सामान्य माणूस सापडला होता. त्यांच्याशी झुंज देत जीवनाचे रहाटगाडगे तो कसेबसे पुढे रेटत राहिला. नवीन वर्षात मोदी सरकार या समस्यांचे ओझे हलके करेल, गेल्या वर्षी कोलमडलेले आपले बजेट सावरायची संधी मिळेल, आपण मोकळा श्वास घेऊ शकू, अशी एक अपेक्षा सामान्य माणसाला होती. मात्र १ जानेवारीपासून लागू होणाऱ्या नवीन नियम आणि बदलांमुळे या अपेक्षांची ‘नवी नवलाई’ संपणार आहे, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.

Share