देशात कोरोनाची चौथी लाट नाही, डॉ.गंगाखेडकरांची माहिती

मुंबई : राज्यात आत्ता कुठे कोरोनाचा विळखा कमी झाला होता. त्यामुळे सरकारने मास्क सक्ती देखील हटविली होती. अशातच राजधानी दिल्लीसह पाच राज्यातील कोरोना बाधितांच्या रूग्णसंख्येत काहीशी वाढ दिसू लागली आहे. त्यामुळे राजधानी दिल्लीमध्ये पुन्हा एकदा मास्क वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे.  या सर्वांमध्ये ICMR चे माजी शास्त्रज्ञ डॉ. रमण गंगाखेडकर यांनी अतिशय महत्त्वाचे मत व्यक्त केले आहे.

ते म्हणाले, देशातील काही भागांमध्ये कोरोना बाधितांची वाढती रूग्णसंख्या कोरोनाची चौथी लाट असल्याचे आतासध्याच्या आकडेवारीवरून तरी वाटत नाहीये. संपूर्ण जगाने BA.2 व्हेरिएंटचा जगभरातील लोकांवर परिणाम होत असल्याचे पाहिले आहे. मात्र, त्यानंतर आतापर्यंत कोरोनाचा कोणताही नवीन व्हेरिएंट समोर आलेला नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. परंतु, जे वृद्ध आहेत, ज्यांनी लस घेतलेली नाही, ज्यांना संसर्ग झाला आहे, त्यांनी सुरक्षिततेसाठी मास्कचा वापर करण आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच मास्कचा वापर ऐच्छिक केल्यामुळे नागरिकांना महामारी संपल्याचे वाटू लागले आहे. मात्र, अद्याप कोरोना कायमचा संपलेला नसून, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नागरिकांनी मास्कचा वापर करणे आवश्यक असल्याचेही गंगाखेडकर यांनी यावेळी सांगितले आहे.

Share