मंदिरात सीसीटीव्ही, मग मशिदीमध्ये का नाही? मनसेचा सवाल

मुंबई : भोंग्याच्या विषयावरून राज्यातील वातावरण तापत चालले असताना मंदिरात सीसीटीव्ही लावले आहेत, मात्र मशिदीत सीसीटीव्ही का नाहीत? असा प्रश्न मनसेने उपस्थित केला आहे. लवकरात लवकर मशिदीसह सर्व धार्मिक स्थळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी मनसेने केली आहे. मात्र, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी, हा ऐच्छिक विषय असून, ज्याने त्याने निर्णय घ्यावा, असे म्हणत हा मुद्दा निकाली काढला आहे.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्यासंदर्भात राज्य शासनाला ३ मेपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. राज ठाकरेंच्या अल्टिमेटमनंतर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बैठकांचे सत्र सुरू आहे. भोंग्याचा प्रश्न निकाली निघालेला नसतानाच मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी राज्य सरकारकडे आणखी एक मागणी केली आहे. जवळपास सगळ्या मंदिरात सीसीटीव्ही लावले आहेत; परंतु मशिदीत सीसीटीव्ही कॅमेरे आहेत का? सर्वधर्मीय प्रार्थनास्थळात सीसीटीव्ही यंत्रणा का करू नये? हे सर्व केल्यास अनेक चुकीच्या गोष्टींना चाप बसेल. तसेच असे करण्यास कोणाचाही आक्षेप असण्याचे कारण नाही. सरकारने याची नियमावली बनवून त्याची कठोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी नांदगावकर यांनी केली होती.

नांदगावकर यांच्या या मागणीवर गृहमंत्री वळसे पाटील यांनी सीसीटीव्ही लावण्यास सरकारचा विरोध असण्याचे काहीच कारण नाही. स्वेच्छेने सीसीटीव्ही लावले जाऊ शकतात, असे स्पष्ट केले आहे. मंदिरात सीसीटीव्ही कंपलसरी लावण्यासंबंधी कुणी सूचना दिलेल्या नाहीत. मंदिरात स्वेच्छेने किंवा सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही लावले असतील किंवा इतरही धार्मिक स्थळांमध्ये सीसीटीव्ही लावायचे असतील तर सरकारचा विरोध असण्याचे काही कारण नाही. ज्याने त्याने आपापल्या इच्छेने निर्णय घ्यावा, सरकारचे काही म्हणणे नाही. हा निर्णय पूर्णत: ऐच्छिक आहे, असे गृहमंत्र्यांनी ठासून सांगितले.

भोंगे लावणे किंवा उतरवणे हे सरकारचे काम नाही
भोंगे (लाऊडस्पीकर) लावणे किंवा उतरवणे हे सरकारचे काम नाही, सरकारची जबाबदारी नाही. ज्याला लाऊडस्पीकर लावायचा आहे, त्याला पोलिसांनी परवानगी घेऊनच लाऊडस्पीकर लावता येतील, अशा स्पष्ट शब्दात गृहमंत्री वळसे पाटील यांनी भोंग्यांबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.

Share