सिद्धू मुसेवाला हत्याकांडातील दोन शूटर्ससह तिघांना अटक

नवी दिल्ली : पंजाबी गायक आणि काँग्रेस नेते सिद्धू मुसेवाला यांच्या हत्या प्रकरणात दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने शूटर्सच्या मॉड्यूल प्रमुखासह दोन मुख्य नेमबाजांना अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि स्फोटके जप्त केली आहेत.

अटक केलेल्या दोन्ही आरोपींनी सिद्धू मुसेवाला यांच्यावर गोळीबार केला होता. ते गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई टोळीशी संबंधित आहेत. या दोन्ही आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे सांगण्यात येत आहे. दिल्ली पोलिसांनी या दोन्ही आरोपींच्या ताब्यातून आठ ग्रेनेड, तीन पिस्तूल, ५० काडतुसे आणि शस्त्रांचा मोठा साठा हस्तगत केला आहे.

सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील लॉरेन्स बिष्णोई मुख्य सूत्रधार

पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची पंजाबमधील मानसा जिल्ह्यात जवारके येथे २९ मे रोजी अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. हल्लेखोरांचा लॉरेन्स बिष्णोई टोळीशी संबंध असल्याचा आरोप आहे. मुसेवाला हत्याकांडातील मुख्य आरोपी गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई सध्या पंजाब पोलिसांच्या ताब्यात आहे. १४ जून रोजी पंजाब पोलिसांनी लॉरेन्सला अटक केली आणि ट्रान्झिट रिमांडवर पंजाबला नेले. सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील लॉरेन्स बिष्णोई हा मुख्य सूत्रधार आहे. त्याची कोठडीत चौकशी करणे आवश्यक आहे, असा युक्तिवाद पंजाब पोलिसांनी दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयात केला होता. सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येचा कट कॅनडापासून दिल्लीच्या तिहार तुरुंगाशी जोडला गेल्याचे आतापर्यंतच्या पोलिस तपासात समोर आले आहे. सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येचा कट तिहार तुरुंगाशी संबंधित असण्याची शक्यता दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला सुरुवातीपासूनच होती. तिहार तुरुंगातून एक फोन नंबर ट्रेस करण्यात आला आहे, असे नुकतेच दिल्ली पोलिस दलातील अधिकाऱ्यांनी सांगितले होते.

गोल्डी ब्रारने स्वीकारली सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येची जबाबदारी

काही दिवसांपूर्वी मोहम्मद शाहरुख या गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली होती. कॅनडामध्ये राहणाऱ्या गोल्डी ब्रार या गुंडाशी बोलण्यासाठी तो मेसेजिंग ॲप वापरत होता. गोल्डी ब्रारने सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यानंतर या हत्येत लॉरेन्स बिष्णोई टोळीचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आहे. गोल्डी ब्रार हा तुरुंगात असलेल्या गुंडाचा जवळचा साथीदार आहे.

संतोष जाधव आणि सौरभ महाकाल पोलिसांच्या जाळ्यात

 

दरम्यान, सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणी संतोष जाधव आणि सौरभ महाकाल या गुन्हेगारांना पुणे गुन्हे शाखेने गेल्याच आठवड्यात बेड्या ठोकल्या आहेत. बॉलिवूड अभिनेता सलमान खान धमकी प्रकरणात मुंबई क्राईम ब्रँचने सौरभ महाकालची चौकशी केली असता महाकालने धक्कादायक खुलासा केला आहे. चित्रपट दिग्दर्शक, निर्माता करण जोहर बिष्णोई गँगच्या निशाण्यावर होता. करण जोहरकडून पाच कोटी रुपये वसूल करण्याची योजना होती, अशी माहिती त्याने पोलिसांना दिली आहे. पोलिस यामध्ये किती तथ्य आहे याची पडताळणी करत आहेत.

याआधी महाकालने अभिनेता सलमान खानला देण्यात आलेल्या धमकीमागे लॉरेन्स बिष्णोई गँग असल्याचे सांगितले होते. त्याने दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानमधील तिघेजण पालघरमधील एका फॅक्टरीत काम करतात. सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र देण्यासाठी तेच मुंबईत गेले होते. जेव्हा पोलिस पालघरमधील फॅक्टरीत पोहोचले तेव्हा हे तिघे तिथे काम करत नसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांना, महाकालने धमकीच्या पत्रामागे असणाऱ्या ज्या तिघांचा उल्लेख केला होता त्यांना ५ जूनला राजस्थानमध्ये दरोड्याच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली असल्याची माहिती मिळाली होती. ते अद्याप जेलमध्येच आहेत. यामुळे पोलिसांनी आपण महाकालने दिलेल्या माहितीवर पूर्णपणे विश्वास ठेवत नसल्याचे म्हटले आहे.

Share