तीन सख्ख्या बहिणींची त्यांच्या दोन चिमुरड्यांसह सामूहिक आत्महत्या

जयपूर : एकाच कुटुंबात लग्न झालेल्या तीन सख्ख्या बहिणींनी त्यांच्या दोन चिमुरड्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना राजस्थानच्या जयपूर जिल्ह्यातील दुडू परिसरात घडली आहे. या सामूहिक आत्महत्येने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी तिन्ही बहिणींचे पती, सासू आणि मेहुण्याला अटक केली आहे.

मृत तिन्ही बहिणींचे लग्न एकाच घरात झाले होते. सासरच्या मंडळींकडून हुंड्यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून या तीन सख्ख्या बहिणींनी आत्महत्या केली असून, आत्महत्येपूर्वी तिन्ही बहिणींपैकी एकीने व्हॉटस्अ‍ॅपवर ठेवलेल्या स्टेटसवरून ही बाब समोर आली आहे. आत्महत्या केलेल्या तीन बहिणींपैकी दोन बहिणी गर्भवती होत्या. मृत मुलांपैकी एकाचे वय ४ वर्षे आणि दुसऱ्याचे वय अवघे २७ दिवस आहे. काली देवी मीना (वय २७ वर्षे), ममता मीना (वय २३ वर्षे) व कमलेश मीना (वय २० वर्षे) अशी मृत बहिणींची नावे आहेत. मृत मुलांपैकी ४ वर्षीय मुलाचे नाव हर्षित असे आहे. मृतांमध्ये अवघ्या २० दिवसांच्या बालकाचाही समावेश आहे.

पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी तिन्ही बहिणींचे पती, सासू आणि मेहुण्याला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये मृत कालीचा पती नरसिंग मीना (वय २९ वर्षे), मयत ममताचा पती जगदीश मीना (वय २७ वर्षे) आणि मयत कमलेशचा पती मुकेश मीना (वय २५ वर्षे) यांचा समावेश आहे. याशिवाय पोलिसांनी तिन्ही बहिणींची सासू आणि मेहुणा संतोष यांना अटक केली आहे. तिन्ही मृत मुली दुडूपासून ३  कि. मी. अंतरावर असलेल्या छप्या गावातील रहिवासी आहेत. त्यांचे सासर दुडू शहरातील मीनाच्या धानीस येथे होते. या तिन्ही बहिणींचे लग्न २००५ मध्ये एकाच कुटुंबातील तीन भावांशी लहान वयात झाले होते. तिघींचेही पती शेतीत काम करतात. सासरच्या मंडळींनी छळ आणि मारहाण केल्याचा आरोप मृत महिलांच्या नातेवाईकांनी केला आहे.

२५ मे रोजी दुपारी या तीन बहिणी आणि त्यांची दोन मुले अचानक बेपत्ता झाले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गुरुवारी २६ मे रोजी कुटुंबीयांनी दुडू पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवून काहीतरी अनुचित प्रकार घडण्याची भीती व्यक्त केली होती. या तीन महिला बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून शोध सुरू केला. महिला व बालकांच्या शोधासाठी पोस्टरही लावण्यात आले होते. मात्र, शनिवारी या महिलांचे मृतदेह विहिरीतून आढळले.

आम्हाला जगायचंय; पण सासरच्या त्रासापेक्षा मरण चांगलं
आत्महत्येपूर्वी तिन्ही बहिणींपैकी एकीने व्हॉटस्अ‍ॅपवर स्टेटस ठेवले होते. ”आम्हाला जगायचंय; पण सासरच्या त्रासापेक्षा मरण चांगलं आहे. या सगळ्यात आमच्या आई-वडिलांचा काहीच दोष नाही. आम्ही जातोय.. आता खुश राहा. आमच्या मृत्यूचं कारण आमच्या सासरचे लोक आहे. रोज रोज मरण्यापेक्षा आम्ही एकत्रच जीव देतोय. हे देवा पुढच्या जन्मी आम्हा बहिणींना एकाच घरात पुन्हा जन्म दे,” असे व्हॉटस्अ‍ॅपवरील स्टेटसमध्ये लिहिले आहे.

तीन बहिणींनी त्यांच्या दोन मुलांसह आपल्या सासरच्या घरापासून दोन किलोमीटर दूर असणाऱ्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. मृतांमध्ये २० दिवसांच्या चिमुरड्याचाही समावेश आहे. सर्वात मोठ्या बहिणीचे नाव काली देवी असे आहे, तर तिच्या दोन्ही लहान बहिणी ममता आणि कमलेश या गरोदर होत्या. त्यातील एक महिला येत्या गुरुवारी प्रसूत होणार होती. मात्र, त्यापूर्वीच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.

Share