अखेर ‘त्या’ वक्तव्याबद्दल चंद्रकांत पाटलांकडून दिलगिरी व्यक्त

मुंबई : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ओबीसी मोर्चा आंदोलनादरम्यान पत्रकारांशी बोलताना काही दिवसांपूर्वी सुप्रिया सुळे यांना उद्देशून केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्यावर जोरदार टीका होत होती. त्यानंतर राज्य महिला आयोगानं पाटील यांना नोटीस पाठवली आणि खुलासा मागितला. आता पाटील यांनी राज्य महिला आयोगाच्या नोटिशीला उत्तर देताना आपल्या विधानाबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.

चंद्रकांत पाटील आपल्या पत्रात म्हणतात…

“आयुष्याची ४५ वर्षे सामाजिक, राजकीय जीवनात गेल्यानंतर स्वयंसिद्धा, Helpers of the Hadicap, सावली, आई, संवेदना आणि वात्सल्य सारख्या संस्थांच्या मागे उभे राहून महिला सबलीकरणासाठी रात्रंदिवस प्रयत्न करणाऱ्या, जगातील सर्वात मोठ्या पक्षाचा प्रदेश अध्यक्ष असणारा मी, ज्या पक्षाच्या महाराष्ट्र विधानसभेत १२ महिला आमदार आणि देशाच्या लोकसभेच महाराष्ट्रातून ५ महिला खासदार आहेत. मला सुप्रियाताईंबद्दल आणि महिलांबद्दल मनात अनादर नसताना ग्रामीण म्हणीचा वापर केल्यामुळे अपमानित व्हावे लागते यासारखे आयुष्यात दु:ख नाही”, अशा भावना चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केल्या.

“माझ्या ओबीसी बंधू-भगिनींना राजकीय आरक्षण न मिळाल्यामुळे मी त्रागाने केलेल्या उच्चारात सुप्रियाताई किंवा समस्त माता-भगिनींचा अपमान झाला असल्यास दिलगिरी व्यक्त करतो”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील ?
ओबीसी आरक्षणासाठी भाजपकडून मंत्रालयाकडून मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी बोलताना त्यांनी ठाकरे सरकारवर कडाडून हल्ला चढवला. मात्र, त्यांनी यावेळी बोलताना सुप्रिया सुळेंवर केलेल्या वादग्रस्त टीकेने वादाला तोंड फुटले. चंद्रकांत पाटील म्हणाले होते की, तुम्ही घरी जा, स्वयंपाक करा. दिल्लीत जा, नाही तर मसणात जा. चंद्रकांत पाटलांच्या या विधानाने राष्ट्रवादीसह महिला वर्गात संताप व्यक्त करण्यात येत होता.

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या होत्या ?
खासदार सु्प्रिया सुळे यांनी मध्य प्रदेशात ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाल्यानंतर प्रतिक्रिया दिली होती. त्या म्हणाल्या होत्या की, दिल्लीमध्ये कोणत्या बैठकीनंतर मध्य प्रदेशात ओबीसी आरक्षण देण्याबाबत निकाल लागला अशी विचारणा करत दिल्लीत गेल्यावर केंद्र सरकारला प्रश्न विचारणार असल्याचे म्हटले होते. यावर प्रतिक्रिया विचारली असता चंद्रकांत पाटील यांची जीभ घसरली होती.

Share