टॉयलेट घोटाळा प्रकरण : संजय राऊतांविरोधात १०० कोटींचा मानहानीचा खटला दाखल

मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या आणि त्यांच्या युवक प्रतिष्ठानवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर आज मेधा सोमय्या यांनी राऊत यांच्याविरुद्ध १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा शिवडी न्यायालयात दाखल केला आहे.

शिवसेना नेते संजय राऊत आणि भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेला वाद आता थेट न्यायालयापर्यंत जाऊन पोहोचला आहे. किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी युवक प्रतिष्ठानच्या माध्यमातून १०० कोटी रुपयांचा घोटाळा केला असल्याचा आरोप संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. या घोटाळ्यासंबंधी आपल्याकडे काही कागदपत्रे असल्याचा दावाही राऊत यांनी केला होता.

गेल्या आठवड्यात किरीट सोमय्या आणि मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्याविरोधात मुलुंड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र, आठ दिवस उलटले असले तरी संजय राऊत यांच्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झाला नसल्याने सोमय्या यांनी आता थेट न्यायालयात धाव घेतली आहे. मेधा सोमय्या यांनी आज (बुधवार) संजय राऊत यांच्याविरोधात मुंबईतील शिवडी न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला आहे. शौचालय घोटाळ्याचा आरोप करून संजय राऊत यांनी आपला छळ आणि बदनामी केल्याचा आरोप मेधा सोमय्या यांनी केला आहे.

उद्धव ठाकरेंना धडा शिकवण्यासाठी राऊतांविरोधात हा खटला दाखल – किरीट सोमय्या
संजय राऊतांविरोधात मानहानी खटला दाखल केल्यानंतर किरीट सोमय्या यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी किरीट सोमय्या यांनी संजय राऊतांसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली. ते म्हणाले, संजय राऊत यांनी आमच्यावर खोटे आरोप केले आहेत. राऊत यांच्याविरोधात आज अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्यात आला आहे. शिवडी कोर्टाने आमचा हा दावा दाखल करून घेतला आहे. यावर पुढील सुनावणी २६ मे रोजी होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्यासाठी संजय राऊत यांच्याविरोधात ही याचिका आहे. शिक्षा त्यांच्या भोंग्याला होणार, मात्र हा इशारा उद्धव ठाकरे यांना आहे. जर आपल्याला शिवडी न्यायालयात न्याय मिळाला नाही तर आपण उच्च न्यायालयातदेखील जाणार आहोत, असेही सोमय्या म्हणाले.

ठाकरे सरकारकडून आम्हाला घाबरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत; परंतु आम्ही त्यांना घाबरत नाही. संजय राऊत यांनी आम्हाला घाबरवण्यासाठी शौचालय घोटाळ्याचा आरोप केला होता. मात्र, आमचा एकही रुपयाचा घोटाळा यांना सापडला नाही. २०१६ सालीही उद्धव ठाकरे यांनी दैनिक ‘सामना’च्या माध्यमातून आमच्यावर ११२ कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा निराधार आरोप केला होता, असे सोमय्या म्हणाले.

Share