इराणमध्ये रेल्वेचा भीषण अपघात; १८ प्रवासी ठार

तेहरान : इराणमध्ये बुधवारी पहाटे रेल्वेचा मोठा अपघात झाला. पूर्व इराणमध्ये आज पहाटे रेल्वे डबे रुळांवरून घसरल्यामुळे १८ प्रवाशांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत ८५ हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. स्थानिक प्रशासनाच्या माहितीनुसार मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. हा रेल्वे अपघात नेमक्या कोणत्या कारणांमुळे झाला हे अद्याप समोर आले नाही.

इराणची राजधानी तेहरानच्या दक्षिणेला ५५० किलोमीटर तर तबास शहरापासून ५० किलोमीटर अंतरावर हा अपघात झाला. हा अपघात नेमका कशामुळे झाला, याचा शोध सुरू आहे. अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिका आणि तीन हेलिकॉप्टर मदतकार्यासाठी पाठवण्यात आले आहेत. हा अपघात दुर्गम भागात झाल्याने तेथे संपर्क प्रस्थापित करण्यात अडचणी निर्माण होत असल्याची माहिती आहे.

इराणमध्ये यापूर्वी २०१६ मध्येदेखील रेल्वेचा अपघात झाला होता. त्यामध्ये १२ लोकांचा मृत्यू झाला होता. इराणमध्ये रेल्वे अपघातांचे प्रमाणदेखील जास्त आहे. २००४ मध्ये इराणमधील ऐतिहासिक शहर नेयशाबूर येथे रेल्वेचाअपघात झाला होता. त्यात ३२० जणांचा मृत्यू झाला होता, तर ४६० जण जखमी झाले होते. पाच गावांवर त्याचा परिणाम झाला होता.

Share