‘अग्निपथ’ योजनेला विरोध करणारे देशद्रोही : योगगुरू बाबा रामदेव

अहमदाबाद : भारतीय लष्कराच्या सशस्त्र दलातील भरतीसंबंधी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या ‘अग्निपथ’ योजनेला देशभरातून विरोध होत आहे. योगगुरू बाबा रामदेव यांनी ‘अग्निपथ’ योजनेचे समर्थन केले असून, या योजनेच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांना देशद्रोही म्हटले आहे.

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या ‘अग्निपथ’ योजनेच्या विरोधात विविध राज्यांमधील तरुण रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. बिहार, तेलंगणामध्ये तरुणांनी जाळपोळ केली. हजारो आंदोलकांनी जाळपोळ आणि नासधूस करून मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय मालमत्तेचे नुकसान केले. या साऱ्या घडामोडींवर योगगुरू बाबा रामदेव यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

गुजरातमधील एका कार्यक्रमात बोलताना योगगुरू बाबा रामदेव म्हणाले, ‘अग्निपथ’ योजना भारत सरकारने विचारपूर्वकच केली असेल. यात सैन्य आणि देशाचे हितच आहे. मग या योजनेविरोधात हिंसा आणि आंदोलन का होत आहे, असा सवाल करून, हिंसा आणि आंदोलन त्वरित थांबवले पाहिजे, असे रामदेव बाबा यांनी म्हटले आहे.
‘अग्निपथ’ योजनेचा विरोध करणारे असे लोक महात्मा गांधींजींच्या अहिंसेच्या देशाचे नागरिक नाहीत. ते देशद्रोही आहेत. कारण, ते आमच्या राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान करत आहेत, असे म्हणत बाबा रामदेव यांनी केंद्र सरकारच्या ‘अग्निपथ’ योजनेचे समर्थन केले आहे. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत तर ते श्रीमंत कुटुंबातील आहेत म्हणून नाही तर त्यांनी संघर्षातून हे स्थान मिळवले आहे. एकेकाळी दिल्लीच्या मनमोहन सिंग सरकारने त्यांना अडचणीत टाकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांच्या धाडसामुळे सरकारला झुकावे लागले होते, असेही बाबा रामदेव यांनी यावेळी सांगितले.

योगगुरू बाबा रामदेव यांनी भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नूपुर शर्मा यांच्या प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयीच्या वादग्रस्त वक्तव्यांवरही प्रतिक्रिया दिली आहे. नूपुर शर्मा यांनी असे वक्तव्य करायला नको होते. कोणत्याही धर्मावर टीका करणे चुकीचे आहे. आपल्या पूर्वजांवर टीका करण्यात आली असती, तर एवढा विरोध झाला नसता. संपूर्ण जग प्रेषितांच्या समर्थनार्थ उभे राहिले. नूपुर शर्मा जे बोलत होत्या, ते आवेशात केलेले विधान होते. दुसऱ्या प्रवक्त्याच्या आरोपाला त्या उत्तर देत होत्या, असे बाबा रामदेव यांनी म्हटले आहे.

Share