माता आरोग्य क्षेत्रातील कामगिरीबद्दल दोन राष्ट्रीय पुरस्कार

पुणे : माता आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल राज्याच्या सार्वजनिक आरोग्य खात्याला राष्ट्रीय पातळीवर दोन पुरस्कार मिळाले. राज्यातील माता मृत्यूदर कमी करणे आणि प्रसूतीदरम्यान पुरविल्या जाणाऱ्या सुविधांची गुणवत्ता वाढविण्यासाठी संस्थेचे प्रमाणीकरण या आधारावर हे पुरस्कार मिळाले आहेत. या यशाबद्दल राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

‘शाश्वत विकास ध्येय’ साध्य करण्यासाठी आणि देशातील माता मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी माता आरोग्य केंद्रात नावीन्यपूर्ण योजनांच्या देवाणघेवाणीबाबत विचार विनिमयासाठी नवी दिल्ली येथे राष्ट्रीय मातृत्व आरोग्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. माता मृत्यू कमी करण्यासाठी आयोजिण्यात आलेल्या या कार्यशाळेची मुख्य संकल्पना ‘टाळता येण्याजोगे माता मृत्यू शून्य करण्यासाठी प्रयत्न’ अशी होती. राष्ट्रीय स्तरावर संस्थांना प्रमाणीकरणासाठी महाराष्ट्राला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते हे दोन्ही पुरस्कार उपसंचालक डॉ. अशोक नांदापूरकर आणि सहायक संचालक डॉ. अनिरुद्ध देशपांडे यांनी स्वीकारले.

Share