उदय सामंत म्हणतात…’या’ कारस्थानाला कंटाळून शिंदे गटात दाखल

गुवाहाटी : गेल्या काही दिवसांपासून शिवसेना पक्ष कमकुवत करण्याचे जे कारस्थान सहयोगी पक्षाकडून सुरू आहे त्याला कंटाळून मी गुवाहाटी येथे आलो आहे. असे मत शिवसेनेचे बंडखोर आमदार उदय सामंत यांनी व्यक्त केले आहे. उदय सामंत यांच्या नाराजीचा व्हिडीओ एकनाथ शिंदे यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे.

राज्यसभा निवडणुकीत संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवारी नाकारून पक्षानं एका सच्चा शिवसैनिकाला राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला, मात्र त्या निवडणुकीत देखील हा उमेदवार निवडून येऊ नये म्हणून मित्रपक्षांनी प्रयत्न केले आणि अखेर उमेदवार पडला, असं म्हणत उदय सामंत यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच, पुढे बोलताना याच कारणामुळे आपण शिंदे गटात सामील होण्याची भूमिका घेत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेलं हिंदुत्व पुढे घेऊन जाणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय मी घेतला आहे. असं असलं तरीही, आजही मी शिवसेनेतच असून त्याबद्दल सर्वसामान्य शिवसैनिकांनी कोकणातील जनतेनं कोणताही गैरसमज करून घेऊ नये., असं आवाहनही उदय सामंत यांनी केलं आहे.

दरम्यान, उदय सामंतदेखील एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले. विशेष म्हणजे, शिंदे गटात सामील होण्यापूर्वी उदय सामंत शिवसेनेच्या कार्यकारणी बैठकीत उपस्थित होते. एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेचे ४० आमदार आणि इतर अपक्षांसह जवळपास ५० आमदारांचा गट तयार केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार सध्या गुवाहाटीतील रॅडिसन हॉटेलमध्ये आहेत. आता या फुटीर आमदारांच्या यादीत उदय सामंत यांचंही नाव जोडलं जाण्याची शक्यता आहे. उदय सामंत हे रत्नागिरीचे आमदार आहेत. कोकणातील दीपक केसरकर यांनीदेखील पक्षाविरोधात बंड पुकारलं आहे. त्याशिवाय, रायगडमधीलही शिवसेनेच्या आमदारांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली आहे.

Share