देशातील सर्वाधिक उंच शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण

औरंगाबादः  राज्यात सगळीकडे सध्या शिवजयंतीचा उत्साह आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती दरवर्षा मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. आज देशातील सर्वाधिक उंचीचा शिवाजी महाराजांच्या पुतळा औरंगाबादच्या क्रांती चौकात बसवण्यात आला आहे. काल रात्री पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी परिसरात आकर्षक रोषणाई करण्यात आल्यामुळे हा परिसर उजळून निघाला होता. या सोहळ्यासाठी शहरातील नामांकित १५ ढोल-ताशा पथकांनी एकत्र येऊन महाशिववादनही केले. शिवरायांचा देशातील सर्वाधिक उंचीचा पुतळा बसवण्यात आल्याने औरंगाबादकरांमध्येही यावेळी उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.


या सोहळ्यासाठी पालकमंत्री सुभाष देसाई आणि अन्य नेत्यांची उपस्थिती यावेळी औरंगाबादेत पहायला मिळाली. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे, मंत्री अब्दुल सत्तार, बाळासाहेब थोरात, असे अनेक नेते पुतळ्याच्या अनावरणाला उपस्थित होते. औरंगाबादेतला हा पुतळा अत्यंत भव्य असा आहे. या पुतळ्याला यावेळी आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती. या पुतळ्यामुळे औरंगाबादच्या वैभवात आणखी वाढ झाली आहे.


औरंगाबाद शहरातील महत्वाचे ठिकाण असलेल्या क्रांती चौकात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची वाढविण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून शिवप्रेमी करत होते. त्यानंतर मागील दोन वर्षापासून क्रांती चौकात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चौथऱ्याची उंची वाढविण्याचे काम सुरू होते. विशेष म्हणजे सोबतच पुणे येथे पुतळा तयार करण्याचे कामही सुरू होते.साडे तीन कोटी रुपये खर्च करून बनवलेल्या शिवाजी महाराजांचा हा पुतळा २५ फूट उंच असून त्याची लांबी २१ फूट एवढी आहे. तर पुतळ्याचे वजन सुमारे ८ टन आहे. तसेच पुतळ्या भोवतीचा चौथरा ३१ फुटांचा आहे. महाराजांच्या नवीन पुतळ्यासाठी १ कोटी तर चौथऱ्यासाठी २.५० कोटी खर्च करण्यात आले आहे.या चौथऱ्याभोवती विविध शिल्प, म्युरल्स, कारंजे सुद्धा तयार करण्यात आले आहेत

Share