‘रिलायन्स जिओ’मध्ये उलथापालथ; मुकेश अंबानी यांचा संचालकपदाचा राजीनामा

मुंबई : आशिया खंडातील श्रीमंत उद्योजक आणि रिलायन्स उद्योग समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. मुकेश अंबानी यांनी ‘रिलायन्स जिओ’च्या संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. आता ‘रिलायन्स जिओ’च्या प्रमुखपदी मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

‘रिलायन्स जिओ’ चे नेतृत्व आता मुकेश अंबानी यांचे चिरंजीव आकाश अंबानी यांच्याकडे देण्यात आले आहे. आकाश अंबानी यांची संचालक मंडळाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. आज मंगळवारी (२८ जून) रिलायन्स उद्योग समुहाकडून या निर्णयाची घोषणा करण्यात आली.

‘रिलायन्स जिओ’ ही दूरसंपर्क सेवा क्षेत्रातील आघाडीची कंपनी आहे. २७ जून २०२२ पासून मुकेश अंबानी यांनी ‘रिलायन्स जिओ’ कंपनीच्या संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. २७ जून २०२२ रोजी ‘रिलायन्स जिओ’च्या संचालक मंडळाची बैठक पार पडली. त्यात ‘रिलायन्स जिओ’च्या संचालक मंडळाच्या अध्यक्षपदी कंपनीचे विद्यमान बिगर कार्यकारी संचालक आणि मुकेश अंबानी यांचे चिरंजीव आकाश अंबानी यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा झाली. याशिवाय पंकज मोहन पवार यांची ‘रिलायन्स जिओ’च्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती पाच वर्षांसाठी आहे. रमिंदर सिंग गुजराल व के. व्ही. चौधरी यांची स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

Share