उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना कोरोनाची लागण

नवी दिल्लीः देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तसेच ओमायक्रॉनची रुग्णसंख्यात देखील दिवसेंदिवस वाढत आहे. यातच आता देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबतची माहिती उपराष्ट्रपती यांच्या सचिवालयाने दिली आहे.

उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू हे हैदराबाद येथे असून त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. कोरोनाची लागण झाल्यामुळे ते एक आठवडा विलीगीकरणात राहणार आहेत. संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करावी आणि स्वतःला आयसोलेट करावे, असे आवाहन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी केले आहे.

काही दिवसांपूर्वी संसदेतील ४०० कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली आहे. ४ ते ८ जानेवारीदरम्यान राज्यसभा सचिवालयायाच्या ६५, लोकसभा सचिवालयाचे २०० आणि इतर सेवेतील १३३ कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली होती. तेव्हा राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकैय्या नायडू यांनी महासचिव पीसी मोदी आणि सल्लागार डॉ.पीपी रामाचार्युलू यांच्याशी चर्चा केली होती. नायडू यांनी सर्व अधिकारी आणि कर्मचार्‍यांची कोरोना चाचणी करण्याचे आदेश दिले असून त्यांच्यावर निगराणी ठेवण्याचे निर्देश दिले होते. वेळ पडली तर कर्मचार्‍यांना रुग्णालयात दाखल करण्यास मदत करावी असेही नायडू यांनी म्हटले होते. सर्व कर्मचार्‍यांना कोरोनासंबंधित नियम पाळण्याचे आदेश देण्यात आले होते. जे लोक कोरोना बाधितांच्या संपर्कात आले आहेत त्यांना आयसोलेट होण्याचा सल्ला देण्यात आला होता. लोकसभा आणि राज्यसभेचे अनेक अधिकारीही सध्या आयसोलेशनमध्ये होते.

Share